मुंबई, 21 मे : टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) राहुल द्रविडने (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक म्हणून जावं, अशी इच्छा बीसीसीआयने (BCCI) व्यक्त केली होती. बीसीसीआयच्या या मागणीला आता राहुल द्रविडनेही प्रतिसाद दिला आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची मागणी द्रविडने स्वीकारली आहे. द टेलिग्राफने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या बातमीनुसार राहुल द्रविड आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीमला मार्गदर्शन करायला तयार आहे.
यावर्षी जुलै महिन्यात भारतीय टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे, पण श्रीलंका क्रिकेट बोर्ड 5 टी-20 मॅचची सीरिज खेळण्यासाठी आग्रही आहे. या दौऱ्यातील वन-डे मॅच 13, 16 आणि 19 जुलैला होणार असून टी 20 मॅच 22 ते 27 जुलैच्या दरम्यान अपेक्षित आहेत.
या काळामध्ये भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे नवोदित खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यासाठी संधी मिळेल. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) असल्यामुळे राहुल द्रविडला ही जबाबदारी मिळेल. तसंच कॅप्टन म्हणून शिखर धवन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांच्यात स्पर्धा आहे.
राहुल द्रविड सध्या बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक आहे. तो यापूर्वी टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे. टीम इंडियाच्या नव्या पिढीतील बहुतेक सर्व खेळाडू द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka, Rahul dravid, Team india