मुंबई, 4 ऑक्टोबर : जर एखाद्या टीमची मॅच तीन दिवसांवर आली असताना खेळाडूंची किट बॅग चोरीला गेली, तर खेळाडूंची अवस्था कशी होईल? ऑस्ट्रेलियाची स्थानिक क्रिकेट टीम क्वीन्सलँडसोबतही (Queensland Cricket Team) असंच झालं आहे. या आठवड्यात गुरुवारी ऍडलेड ओव्हलमध्ये शेफील्ड शील्डच्या (Sheffield Shield) मुकाबल्यात क्वीन्सलँडचा सामना टास्मानियाविरुद्ध (Tasmania) होणार आहे. पण या सामन्याआधी टीमच्या व्हॅनमधून अनेक खेळाडूंचं क्रिकेट कीट चोरीला गेलं आहे. क्वीन्सलँड टीमने याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे आणि चोरांना शोधण्याचं काम सुरू आहे.
क्वीन्सलँडच्या टीमचा विकेट कीपर बॅट्समन जिमी पियरसनने या चोरीचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. यामध्ये टीमची व्हॅन उभी असल्याचं दिसत आहे, तसंच या व्हॅनच्या काचाही तुटल्या आहेत. याच व्हॅनमधून खेळाडूंच्या किट चोरीला गेल्या. मी यातल्या कमनशीबी लोकांपैकी आहे, ज्याच्या दोन बॅट चोरीला गेल्या, असं पियरसनने त्याच्या पोस्टमध्ये म्हणलं आहे. जर ऍडलेडमध्ये कोणालाही दोन नव्या बॅट दिसल्या तर प्लीज मला याची माहिती द्या, असं आवाहनही त्याने केलं आहे. टीमची व्हॅन हॉटेलच्या पार्किंगबाहेर उभी होती, तेव्हाच चोरांनी डल्ला मारला.
क्वीन्सलँडच्या टीमने तक्रार दाखल केल्यानंतर साऊथ ऑस्ट्रेलिया पोलिसांची तपासाला सुरुवात केली आहे. चोरांना शोधण्यासाठी हॉटेलमधले सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत. शेफील्ड शिल्डचे गतविजेते क्वीन्सलँड या गुरुवारी टास्मानियाविरुद्धच्या सामन्याने या मोसमाची सुरुवात करणार आहेत. हा सामना 28 सप्टेंबरला ब्रिस्बेनमध्ये होणार होता, पण तिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे टास्मानियाची टीम घरी परतली होती. यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सामन्याचं वेळापत्रक बदललं. ही मॅच आता ऍडलेडमध्ये होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket