पुणे, 03 नोव्हेंबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवर ऋतुराज गायकवाडने आपल्या खेळाने क्रिकेटतज्ज्ञ, चाहते सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. महाराष्ट्राच्या संघातून खेळणाऱ्या ऋतुराजने सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकवत सामनावीराचा किताब पटकवला आहे. त्याच्या खेळामुळे भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही त्याचं कौतुक केलं आहे. पुण्याच्या या खेळाडूचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी करत मन शांत ठेवत वेळेनुसार बचावात्कम आणि फटकेबाजी करत खेळणाऱ्या ऋतुराजने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. आता सलामीला फलंदाजीला येणारा ऋतुराज पहिल्यांदा मधल्या फळीत फलंदाजी करायचा. पण सात वर्षांपूर्वी त्याचे क्रिकेट कोच संदीप चव्हाण यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे त्याचं नशीबच बदलून टाकलं. संदीप यांनीच ऋतुराजचं कौशल्य बघून त्याला सलामीला फलंदाजीला यायचा सल्ला दिला होता.
वाचा-IPL 2020: प्लेऑफमध्ये जागा मिळवूनही श्रेयस अय्यरसमोर ‘ही’ मोठी अडचण!
कोचच्या सल्ल्यामुळे ऋतुराजचं आयुष्यच बदललं
ऋतुराजचे कोच संदीप चव्हाण म्हणाले, ‘ तो पुण्यातल्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत आमच्याकडे प्रशिक्षणाला यायचा. मला वाटतं तो 16 वर्षांचा होता आणि ज्युनियर स्तरावर महाराष्ट्राच्या संघातून खेळायचा. त्या संघात तो मधल्या फळीत फलंदाजी करायचा. मला आठवतंय की क्लब मॅचमध्ये मी ऋतुराजला सलामीला फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता आणि भविष्यात त्याचा तुला फायदा होईल असंही सांगितलं होतं.’ चव्हाण असेही म्हणाले, ‘ तो 16 वर्षांचा असताना स्थानिक वरिष्ठ दर्जाच्या मांडके करंडक स्पर्धेत ऋतुराजने सलामीला येऊन 100 आणि 90 धावा केल्या होत्या आणि माझा निर्णय सार्थ ठरवला होता. राज्य स्तरावर खेळताना सुरुवातीला त्याला सलामीला आल्यावर थोडा त्रास झाला पण नंतर त्यानी त्याची सवय करून घेतली आणि सलामी स्पेशलिस्ट झाला.’ ऋतुराज 2008-09 मध्ये 12 व्या वर्षीच या अकादमीत प्रशिक्षणात आला होता तेव्हाच त्याच्यातील विशेष प्रतिभेची त्यांना जाणीव झाली होती असंही चव्हाण म्हणाले.
वाचा-70 मिनिटं नाही 240 चेंडू, आता शाहरुखच्या KKRचं नशीब मुंबई इंडियन्सच्या हाती
तंत्रातही होती कमतरता
संदीप चव्हाण पुढे म्हणाले, ‘ सुरुवातीला त्याच्या तंत्रातही कमतरता होती. त्यानी अंडर 14 ऐवजी अंडर 19 गटातून खेळायला सुरुवात केल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला.’ ऋतुराजच्या लहानपणीचे कोच मोहन जाधव म्हणाले, ‘ऋतुराजनी आयपीएलमध्ये जशी कामगिरी केली होती तशीच या आधी वरिष्ठ स्तरावर खेळताना करून दाखवली आहे. निमंत्रित करंडक स्पर्धेत त्याला पहिल्या दोन सामन्यांत यश मिळालं नव्हतं. तिसऱ्या सामन्यात चांगली फलंदाजी झाल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानी अंतिम सामन्यात 182 धावा केल्या. त्यामुळेच महाराष्ट्राच्या ज्युनिअर संघात त्याची निवड झाली होती. ऋतुराजला त्याचा खेळ समजतो आणि स्वत: मध्ये बदल करण्याची त्याची तयारी असते हेच त्याचे महत्त्वाचे गुण आहेत.’