मुंबई, 3 नोव्हेंबर : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे टीम इंडियाचं (Team India) यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) मोठं नुकसान झालं आहे. भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्याला ऑलराऊंडर म्हणून निवडण्यात आलं होतं, पण पाकिस्तानविरुद्ध त्याने बॉलिंग केली नाही. तर न्यूझीलंडविरुद्ध मॅच हातातून गेल्यानंतर विराटने त्याच्याकडे बॉल दिला. किवी टीमविरुद्ध हार्दिकने दोन ओव्हर बॉलिंग केली, यात त्याने 17 रन दिले. याआधी हार्दिकने आयपीएलमध्येही बॉलिंग केली नव्हती, त्यामुळे आता टीम इंडियाला हार्दिकच्या पर्यायाकडे बघावं लागणार आहे. 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) निवड समिती ऑलराऊंडर्सवर नजर ठेवेल.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून ऑलराऊंडर्सना फक्त भारतीय टीममध्येच प्रवेश मिळणार नाही, तर आयपीएलच्या लिलावामध्येही त्यांच्यावर कोट्यवधींची बोली लागेल. मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विजय शंकर (तामीळनाडू), शिवम दुबे (मुंबई) आणि व्यंकटेश अय्यर (मध्य प्रदेश) या तीन फास्ट बॉलिंग करणाऱ्या ऑलराऊंडर्सवर निवड समितीचं लक्ष असेल. सौराष्ट्रचा 31 वर्षांचा चिराग जानीदेखील चांगला पर्याय ठरू शकतो.
टीम इंडियाची सध्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे टॉप-5 बॅटरपैकी एकही जण बॉलिंग करत नाही, त्यामुळे मुंबईचा ओपनर पृथ्वी शॉदेखील (Prithvi Shaw) सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत ऑफ स्पिन बॉलिंग करणार आहे, असं सांगितलं जातंय. कृणाल पांड्याच्या कामगिरीवरही निवड समितीचं लक्ष असेल.
महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड, कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल आणि रवीकुमार समर्थ, तामीळनाडूचा के एन जगदीशन, सी हरी निशांत हे खेळाडूही मोठा स्कोअर करण्याचा प्रयत्न करतील. ऋद्धीमान साहा आणि अजिंक्य रहाणेसारखे सीनियर खेळाडूही आपला दावा मजबूत करण्यासाठी मैदानात उतरतील. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत टीमना पाच एलीट ग्रुप आणि एक प्लेट ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धा बायो-बबलमध्ये खेळवण्यात येणार आहे.
एलीट ग्रुप ए : पंजाब, तामीळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र, गोवा आणि पॉन्डेचेरी (स्थान – लखनऊ)
एलीट ग्रुप बी : बंगाल, छत्तीसगड, कर्नाटक, मुंबई, बडोदा, सेना (स्थान – गुवाहाटी)
एलीट ग्रुप सी – जम्मू काश्मीर, झारखंड, हिमाचल , राजस्थान, हरियाणा,आंध्र (स्थान – बडोदा)
एलीट ग्रुप डी – रेल्वे, आसम, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, बिहार (स्थान – दिल्ली)
एलीट ग्रुप ई – उत्तर प्रदेश, हैदराबाद, उत्तराखंड, सौराष्ट्र, दिल्ली, चंडीगड (स्थान – हरियाणा)
प्लेट ग्रुप – त्रिपुरा, विदर्भ, नागालँड, मेघालय, मणिपूर, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम (स्थान – विजयवाडा).
नॉक आऊट सामने दिल्लीमध्ये खेळवले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, Prithvi Shaw, T20 world cup