मुंबई, 25 फेब्रुवारी : क्रिकेटकडे सध्या खेळ म्हणून पाहण्यापेक्षा करिअर म्हणून पाहिलं जातं. अनेक दिग्गज क्रिकेटपटू यामुळे निवृत्ती घेत आहेत. आंतरराष्ट्रीय संघातून बराच काळ बाहेर राहिल्यानंतर, पुनरागमन शक्य नसेल तर खेळाडू निवृत्ती घेतात. भारताच्या अनेक खेळाडूंनी गेल्या वर्षभरात निवृत्ती घेतली आहे. आता भारताचा फिरकीपटू प्रज्ञान ओझाने गेल्या आठवड्यात निवृत्तीची घोषणा केली. परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी प्रज्ञान ओझाने बीसीसीआयकडे परवानगीही मागितली होती.
ओझाने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. युवराज सिंगने निवृत्तीनंतर परदेशी लीगमध्ये सहभाग घेतला. तो कॅनडातील ग्लोबल टी20 आणि टी10 मध्ये खेळला. निवृत्तीनंतर आता युवराज सिंग आयपीएल खेळू शकणार नाही. तसंच प्रज्ञान ओझाचं आयपीएलमधील करिअरही संपुष्टात आलं आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ओझाने जास्त सामने खेळले. त्यानं धोनीला गोलंदाजांचा कर्णधार असंही म्हटलं होतं. भारतासाठी अजुन क्रिकेट खेळण्याची संधी मिळायला हवी होती अशी खंत त्यानं व्यक्त केली होती. कसोटीमध्ये ओझाने 113 विकेट घेतल्या आहेत.
प्रज्ञान ओझाला चांगल्या कामगिरीनंतरही संघातून बाहेर रहावं लागलं. सचिनने निवृत्ती घेतली तोच ओझाचाही अखेरचा कसोटी सामना ठरला. 2013 मध्ये विंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात 5-5 असे मिळून दहा गडी बाद केले होते. या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण या सामन्यानंतर ओझाला संघात स्थान मिळालं नाही.
वाचा : 'प्रत्येक सामन्यासाठी नवा संघ, या खेळाडूला बाहेर का बसवलं?' कपिल देव भडकले
भारतीय संघानंतर त्याने आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. 2010 मध्ये 21 विकेट घेऊन त्याने पर्पल कॅप जिंकली होती. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फिरकीपटू होता. तरीही 2015 नंतर त्याला कोणत्याच संघाने आयपीएलमध्ये संधी दिली नाही.
वाचा : विराटची मोठी चूक, पराभवाचं खापरं टॉसवर फोडलं पण आकडे वेगळंच सांगतात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket