Home /News /sport /

तुम्हालाही उश्यांची मारामारी आवडते? लवकरच होणार 'Pillow Fight Championship'

तुम्हालाही उश्यांची मारामारी आवडते? लवकरच होणार 'Pillow Fight Championship'

तुम्हाला उश्यांची मारामारी म्हणजेच पिलो फाइट (Pillow Fight) आठवते? आपल्यापैकी अनेकजण हा खेळ लहानपणी अगदी मनापासून खेळले असतील. आता या खेळाचीही आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप (Pillow fight championship) स्पर्धा भरवण्यात येत आहे.

मुंबई, 30 नोव्हेंबर : तुम्हाला उश्यांची मारामारी म्हणजेच पिलो फाइट (Pillow Fight) आठवते? आपल्यापैकी अनेकजण हा खेळ लहानपणी अगदी मनापासून खेळले असतील. अजूनही आपल्या मुलांबरोबर किंवा भावंडांबरोबर किंवा जुन्या मित्र-मैत्रिणींबरोबर पिलो फाइट खेळण्याची मजा काही औरच. अशी ही पिलो फाइट आता फक्त बेडरुमपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आता या खेळाचीही आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप (Pillow fight championship) स्पर्धा भरवण्यात येत आहे. फ्लोरिडामध्ये (Florida) येत्या 29 जानेवारीला पहिली पिलो फाइट चॅम्पियनशीप (PFE) होणार आहे. या लहानपणाच्या अगदी आवडत्या खेळाचं क्रीडा प्रकारात रूपांतर करण्याचं स्वप्न स्टीव्ह विल्यम्स यानं पाहिलं आणि आता ते या चॅम्पियनशीपच्या रूपातून प्रत्यक्षात उतरत आहे. या स्पर्धेत पिलो फाइट व्यावसायिकपणे खेळवण्यात येणार आहे. यामध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट (Mixed Marshal Art) म्हणजेच MMA किंवा बॉक्सिंगच्या स्पर्धेचा पूर्ण थरारही अनुभवायला मिळेल असा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. “तुम्ही बसून खेळ बघत आहात, हसत आहात आणि तुमच्या आजूबाजूला मस्त पिसं उडताहेत असा हा अनुभव नक्कीच नसेल. ही अत्यंत गंभीर आणि वैशिष्ट्यपूर्ण उश्यांच्या साह्याने खेळवली जाणारी स्पर्धा असेल,” असं PFC चे सीईओ विल्यम्स यांनी सांगितलं. अर्थात या स्पर्धेतले स्त्री-पुरुष स्पर्धक हे बहुतेक MMA आणि बॉक्सिंग जगतातलेच असतील. ही स्पर्धा मुलांना नक्कीच आवडेल असा दावा करण्यात येत आहे. ‘MMA मध्ये स्पर्धक जखमी किंवा गंभीर जखमीही होतात. आमच्या लढतीत कुणी जखमी होणार नाही हा मुख्य फरक आहे,’ असा दावा विल्यम्स यांनी केला आहे. 'स्पर्धकांनाही जखमी व्हायला आवडत नाही आणि रक्त बघायला न आवडणारे प्रेक्षकही बरेच आहेत. त्यांना हिंसाचार बघायचा नाही तर एक चांगली स्पर्धा बघायची आहे,' असं विल्यम्स यांचं म्हणणं आहे. आपल्यापैकी अनेकांना उश्यांची मारामारी अर्थात पिलो फाइट हा खेळ नक्कीच जवळचा वाटतो. आपल्या अनेक आठवणीही त्याच्याशी निगडित आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी खास प्रेक्षकवर्ग नक्कीच असेल अशी आशाही आयोजकांना वाटत आहे. या खेळाला तुम्ही आत्ता पर्यायी क्रीडाप्रकार समजू शकता; पण लवकरच तो मुख्य क्रीडाप्रकारात येईल असा विश्वास विल्यम्स यांना वाटतो. ही स्पर्धा रिंगणात खेळवली जाणार आहे. एरव्ही स्थानिक संगीत आणि रॅप म्युझिक एकत्र आणून दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं. आम्हीही असंच दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असं विल्यम्स यांचं म्हणतात. 29 जानेवारीला फ्लोरिडा इथं ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये प्रत्येक लढत तीन राउंड्समध्ये होईल. ही स्पर्धा स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म FITE वर दाखवण्यात येणार आहे. तुम्हीही MMA किंवा पिलो फाइटचे फॅन असाल तर मग ही स्पर्धा चुकवू नका.
First published:

पुढील बातम्या