मुंबई, 11 डिसेंबर : 2021 मध्ये भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी विराट कोहली (Virat Kohli)ऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma)कडे भारतीय टीमचं नेतृत्व द्यावं, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये विराट कोहलीच्या बँगलोर (RCB) टीममध्ये असलेल्या पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने याबाबत त्याचं मत मांडलं आहे. काहीच दिवसांपूर्वी रोहित शर्माचं नेतृत्व कौशल्य विराटपेक्षा चांगलं असल्याचं पार्थिव म्हणाला होता. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहितला कर्णधार करावं, या मागणीचं समर्थनही पार्थिवने केलं आहे.
क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पार्थिव पटेल स्पोर्ट्स तकसोबत बोलत होता. यावेळी बोलताना पार्थिवला सध्याच्या भारतीय कर्णधारपदाबाबत विचारण्यात आलं, तेव्हा टी-20 क्रिकेटमध्ये विराटऐवजी रोहितला नेतृत्व द्यावं, असं पार्थिव म्हणाला.
'टीम कशा बनवायच्या, हे रोहितने आपल्याला दाखवून दिलं आहे. एका फॉरमॅटचं नेतृत्व रोहितला दिलं तर त्यात काहीही नुकसान होणार नाही. यामुळे विराटवरचा थोडा दबावही कमी होईल. रोहितने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत, त्यामुळे दबावात तो काय निर्णय घेतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मुंबईची टीम प्रत्येकवर्षी संतुलित नसते, पण खेळाडू कसे तयार केले जातात आणि निकाल दिले जातात, हे रोहितने आपल्याला दाखवून दिलं आहे', अशी प्रतिक्रिया पार्थिवने दिली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या रेकॉर्डमुळे पार्थिवने टी-20 मध्ये नेतृत्व बदल करण्याचं समर्थन केलं आहे. पुढच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जर रोहित शर्मा खेळण्यासाठी फिट होत असेल, तर त्याला स्पर्धेआधीच नेतृत्व देण्यात यावं, अशी मागणी पार्थिव पटेलने केली आहे. तसंच रोहित आणि विराट यांना वेगवेगळ्या फॉरमॅटचं नेतृत्व दिलं, तरी त्यांच्यात प्रतिस्पर्धा वाढणार नाही, असं पार्थिवला वाटतं.
'यामुळे विराट आणि रोहित यांच्यात प्रतिस्पर्धा तयार होणार नाही, हे प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण भारताकडे नेतृत्वासाठी पर्याय आहेत. जर पर्यायच नसता तर दोघांमध्ये तुलनाही झाली नसती. आयपीएलमुळे दोन्ही खेळाडूंना व्यासपीठ मिळालं, त्यामुळे दोघांच्या नेतृत्वाची तुलना होत आहे,' असं वक्तव्य पार्थिव पटेलने केलं. या मोसमात पार्थिव पटेल बँगलोरच्या टीममध्ये होता, पण त्याला एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.