मुंबई, 11 डिसेंबर : टीम इंडियाचा माजी विकेट कीपर-बॅट्समन पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर एकाच दिवसात पार्थिव पटेलवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने नवीन जबाबदारी सोपवली आहे. पार्थिव पटेल यांची मुंबई इंडियन्सचा टॅलेन्ट स्काऊट म्हणून नियुक्ती झाली आहे. पार्थिव पटेल मुंबईसाठी देशभरातल्या प्रतिभावान युवा खेळाडूंना शोधण्याचं काम करणार आहे. भारताकडून 25 टेस्ट, 38 वनडे आणि दोन टी-20 खेळणाऱ्या पार्थिवने बुधवारी क्रिकेटमधून संन्यास घेतला.
'पार्थिव पटेल दोन दशकांपासून जास्त काळ स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. याशिवाय त्याला आयपीएलचीही माहिती आहे,' अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सनी दिली आहे. पार्थिव पटेल टीमशी जोडला गेल्यामुळे आपण आनंदी आहोत, असं मुंबई इंडियन्सने मालक आकाश अंबानी म्हणाले.
'जेव्हा पार्थिव मुंबईकडून खेळला, तेव्हा त्याचा क्रिकेटबद्दलचा समज कळाला. त्याला खेळाबद्दल खूप ज्ञान आहे, याचा फायदा नवीन प्रतिभावान खेळाडू शोधण्यात होईल,' असं वक्तव्य आकाश अंबानी यांनी केलं.
“@parthiv9 understands our ideology, the DNA of #MumbaiIndians and what we are trying to create at MI. We welcome him to our #OneFamily.” - Akash Ambani
Read more https://t.co/qGY6v7jH9u
— Mumbai Indians (@mipaltan) December 10, 2020
'मुंबईकडून खेळताना मी खेळाचा पूर्ण आनंद घेतला होता. मुंबईसोबत घालवलेली तीन वर्ष अजूनही माझ्या लक्षात आहेत. आता आयुष्यातला नवा अध्याय सुरू करत आहे. मुंबईने दिलेल्या या संधीबाबत मी त्यांचा आभारी आहे,' असं पार्थिव पटेल म्हणाला.
मुंबईने 2015 आणि 2017 साली आयपीएल जिंकली तेव्हा पार्थिव पटेल त्या टीममध्ये होता. 2002 साली पार्थिवने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याचसोबत तो टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात लहान वयात पदार्पण करणारा विकेट कीपर बनला होता. पार्थिवने 17 वर्ष आणि 153 दिवस एवढं वय असताना पदार्पण केलं होतं.
पार्थिव पटेलने टेस्टमध्ये 31.13 च्या सरासरीने 934 रन केले. तर वनडेमध्ये त्याने 23.7 च्या सरासरीने 736 रन केले. विकेट कीपर म्हणून पार्थिवने टेस्टमध्ये 62 कॅच पकडले, तर 10 स्टम्पिंग केले. पार्थिवच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली, पण 2004 साली दिनेश कार्तिक आणि एमएस धोनीच्या उदयानंतर पटेलला फार संधी मिळाली नाही.