कराची, 05 फेब्रुवारी : पाकिस्तानमध्ये रविवारी पुन्हा एकदा स्फोट झाला. क्वेटा पोलिस लाइन परिसरात झालेल्या या बॉम्ब स्फोटात किमान ५ जण जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पेशावरमध्ये भीषण आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा झालेला स्फोट हा नवाब अकबर बुगती स्टेडियमपासून जवळच झाला आहे. या स्टेडियमवर पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आजम आणि शाहिद आफ्रिदी इत्यादी सराव करत होते. स्फोटानंतर सर्व क्रिकेटर्सना सुरक्षेच्या कारणास्तव ड्रेसिंगरूममध्ये नेण्यात आले. पीएसलच्या एका सामन्यात ते सर्वजण खेळत होते. स्फोटानंतर सामना तात्काळ थांबवण्यात आला.
पोलिस लाइन्स परिसरात झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, बचावकार्य पूर्ण झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. बॉम्ब स्फोटानंतर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये असलेल्या जीशान अहमदने म्हटलं की, स्फोटातील जखमींना जवळच्या सिव्हील रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर तात्काळ इमर्जन्सी आणि पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या स्फोट झालेला परिसर सील करण्यात आला आहे.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची मुख्य प्रशिक्षक शार्लट एडवर्डस् आहे कोण?
तहरीक ए तालिबान पाकिस्तानने रविवारी एका निवेदनाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्यात म्हटलं आहे की, सुरक्षा अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यात आलं होतं. दरम्यान, दुसऱ्या बाजूला पीएसलची टीम क्वेटा ग्लेडिएटर्स आणि पेशावर जाल्मी यांच्यात एक प्रेक्षणीय सामना आय़ोजित केला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोट होताच सुरक्षेच्या कारणास्तव सामना तात्काळ थांबवण्यात आला आणि खेळाडूंना काही काळासाठी ड्रेसिंगरुममध्ये नेण्यात आलं. काही वेळाने पुन्हा सामना सुरू केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.