लाहोर, 11 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय (BCCI) जगातलं सगळ्यात श्रीमंत बोर्ड आहे, ते जागतिक क्रिकेटला कंट्रोल करतात. इंग्लंडने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा (England Cancels Pakistan Tour) दौरा रद्द केला, पण भारताविरुद्ध असं करायची हिंमत कोणीच करू शकत नाही, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजाही (Ramiz Raja) असंच म्हणाले होते. बीसीसीआयने जर आयसीसीचं फंडिंग थांबवलं तर पाकिस्तान बर्बाद होईल, अशी प्रतिक्रिया रमीझ राजा यांनी दिली होती.
मिडल इस्ट आयसोबत बोलताना इम्रान खान म्हणाले, 'पैसा सध्या सगळ्यात महत्त्वाचा आहे. भारत सगळ्यात श्रीमंत बोर्ड आहे, त्यामुळे कोणताच देश त्यांच्याविरुद्ध असं पाऊल उचलायची हिंमत करणार नाही, जे इंग्लंडने पाकिस्तानसोबत उचललं. फक्त खेळाडूंनाच नाही तर वेगवेगळ्या देशाच्या बोर्डांनाही भारताकडून पैसे मिळतात, त्यामुळे ते संपूर्णपणे क्रिकेटला कंट्रोल करतात.'
'पाकिस्तानसारख्या देशांविरुद्ध खेळून आपण त्यांच्यावर उपकार करतो, असं इंग्लंडला अजूनही वाटतं, याचं एकमेव कारण पैसा आहे. मी पाकिस्तान आणि इंग्लंडचे क्रिकेट संबंध वाढताना बघितले आहेत. पण इकडे त्यांनी स्वत:ला खाली दाखवलं,' असं इम्रान खान यांना वाटतं. टी-20 वर्ल्ड कपआधी इंग्लंडची टीम पाकिस्तान दौऱ्यावर 2 टी-20 मॅच खेळायला जाणार होती, याशिवाय इंग्लंडची महिला टीमही पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होती, पण सुरक्षेच्या कारणामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा रद्द केला.
इंग्लंडने दौरा रद्द करण्याआधी न्यूझीलंडनेही अशाचप्रकारे अखेरच्या क्षणी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. न्यूझीलंडची टीम पाकिस्तानमध्ये पोहोचली होती. पहिली मॅच सुरू व्हायच्या अर्धा तास आधी न्यूझीलंडने दौरा रद्द (New Zealand Cancels Pakistan Tour) केला. यामुळे टी-20 वर्ल्ड कपची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का लागला. आयसीसीला 90 टक्के महसूल भारताकडून मिळतो, असं पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Imran khan, Pakistan