...तर पाकिस्तानचा मोहम्मद आमीर IPL खेळणार, जाणून घ्या कसं?

...तर पाकिस्तानचा मोहम्मद आमीर IPL खेळणार, जाणून घ्या कसं?

28 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमीर (Mohammad Amir) भविष्यात आयपीएलमध्ये (IPL) खेळताना दिसू शकतो.

  • Share this:

मुंबई, 12 मे : 28 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमीर (Mohammad Amir) भविष्यात आयपीएलमध्ये (IPL) खेळताना दिसू शकतो. आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना खेळण्याची परवानगी नाही, पण आमीर सध्या इंग्लंडमध्ये राहत आहे, तसंच तो इंग्लंडमधली नागरिकता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जर आमीरला इंग्लंडचं नागरिकत्व मिळालं, तर त्याचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. याआधी पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर अजहर महमूदही (Azar Mahamood) इंग्लंडचं नागरिकत्व घेतल्यानंतर आयपीएल खेळला आहे.

'मी बराच काळ इंग्लंडमध्ये राहणार आहे, इकडे मला क्रिकेट एन्जॉय करायचं आहे. पुढची 6-7 वर्ष मला आणखी खेळायचं आहे. माझी मुलं इंग्लंडमध्येच मोठी होतील आणि इकडेच शिक्षण घेतील, त्यामुळे मी इकडेच राहणार यात शंका नाही,' असं आमीर म्हणाला. मोहम्मद आमीरने डिसेंबर 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. यासाठी त्याने पाकिस्तानचा प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूसला दोष दिला होता.

मोहम्मद आमीरला आयपीएल खेळण्याबाबतही प्रश्न विचारण्यात आले. भविष्यातल्या योजनांबाबत मी विचार केला नाही, मला जेव्हा इंग्लंडचं नागरिकत्व मिळेल, तेव्हा गोष्टी सोप्या होतील. टीम प्रशासनाकडून मला सन्मान मिळाला नाही, म्हणून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पाकिस्तानकडून निवृत्ती घ्यायाचा निर्णय कठीण होता, पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता, अशी प्रतिक्रिया आमीरने दिली.

2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता, तेव्हा मोहम्मद आमीरने धमाकेदार कामगिरी केली होती. आमीरने 6 ओव्हरमध्ये 16 रनन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या, यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या विकेटचा समावेश होता. आमीर पाकिस्तानकडून 36 टेस्ट, 61 वनडे आणि 50 टी-20 खेळला. वनडेमध्ये त्याने 81 आणि टी-20 मध्ये 59 विकेट घेतल्या. 2019 साली आमीर शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. मॅच फिक्सिंग प्रकरणी त्याच्यावर बंदीही घालण्यात आली होती.

Published by: Shreyas
First published: May 12, 2021, 9:55 PM IST

ताज्या बातम्या