कराची, 13 डिसेंबर : पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) त्याच्या मुलीवरून पसरत असलेल्या अफवांमुळे चांगलाच संतापला आहे. माझी मुलगी आजारी असून हॉस्पिटलमध्ये असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं आफ्रिदी म्हणाला. पाकिस्तानी टीव्ही चॅनल जियो टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आफ्रिदीने नाराजी जाहीर करत सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे आणि अशा खोट्या बातम्या पसरवू नयेत, असं सांगितलं आहे. तसंच माझी मुलगी आजारी नसल्याचंही आफ्रिदी म्हणाला आहे.
शाहिद आफ्रिदी 2 डिसेंबरला एका आठवड्यातच लंका प्रिमीयर लीग (LPL 2020) सोडून पाकिस्तानला परतला होता. स्पर्धा अर्ध्यातच सोडण्याचं कारण आफ्रिदीने सांगितलं नव्हतं. वैयक्तिक कारणामुळे आपण लंका प्रिमीयर लीग सोडून जात आहोत, परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी येईन, अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली. आफ्रिदीची मुलगी आजारी असल्यामुळे तो लंका प्रिमीयर लीग सोडून पाकिस्तानला परतल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
मागच्याच आठवड्यात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये आफ्रिदीची मुलगी हॉस्पिटलच्या बेटवर झोपली आहे आणि बाजूला आफ्रिदी उभा आहे. अफवा पसरल्यानंतर आफ्रिदी काही दिवस गप्प होता. मागच्या आठवड्यात त्याने इन्स्टाग्रामवर मुलीसोबतचा एक फोटोही शेयर केला होता आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
View this post on Instagram
आफ्रिदीला 5 मुली
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आफ्रिदी पाचव्यांदा बाप झाला होता. आफ्रिदीला पाचही मुलीच आहेत. पाकिस्तानकडून 20 वर्ष खेळणाऱ्या आफ्रिदीच्या नावावर वनडेमध्ये 8 हजारपेक्षा जास्त रन आहेत. एलपीएलच्या सुरुवातीलाच आफ्रिदीने जाफना स्टॅलियन्सविरुद्ध खेळताना वादळी अर्धशतक केलं होतं. त्याने फक्त 23 बॉलमध्येच 58 रनची आक्रमक खेळी केली होती.