कर्णधाराच्या हकालपट्टीनंतर शेअर केला VIDEO, क्रिकेट बोर्डाला मागावी लागली माफी

कर्णधाराच्या हकालपट्टीनंतर शेअर केला VIDEO, क्रिकेट बोर्डाला मागावी लागली माफी

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून सर्फराज अहमदला हटवल्यानंतर VIDEO शेअर करणं क्रिकेट बोर्डाला महागात पडलं. पोस्ट करण्याची वेळ चुकली असं म्हणत माफी मागावी लागली.

  • Share this:

कराची, 18 ऑक्टोबर : पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने मोठे बदल केले आहेत. पाकिस्तानने सर्फराज अहमदला कसोटी आणि टी20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं आहे. कसोटी संघाच्या कर्णधारपदी अझर अली तर टी20 साठी बाबर आझमची निवड करण्यात आली आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सर्फराजला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर माफी मागावी लागली आहे. यामागे ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ कारणीभूत ठरला आहे.

सर्फराजला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये खेळाडू डान्स करताना दिसत आहेत. या पोस्टनंतर पाकिस्तानी चाहत्यांनी पीसीबीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. शेवटी वाढत चाललेला वाद थांबवण्यासाठी पीसीबीनं व्हिडिओ डिलीट करत माफी मागितली.

शुक्रवारी सर्फराज अहमदला कसोटी आणि टी20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर काही वेळातच पीसीबीच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. यामध्ये सर्फराजसोबत काही खेळाडू डान्स करताना दिसत होते. शेवटी चाहत्यांचा रोष ओढवल्यानंतर पीसीबीने माफी मागत व्हिडिओ पोस्ट करण्याची वेळ चुकली असं सांगितलं.

पीसीबीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एक वर्ष जुना व्हिडिओ असून टी20 वर्ल्ड कपच्या प्रमोशनल इव्हेंटचा एक भाग होता. या व्हिडिओला चुकीच्या वेळी पोस्ट केलं गेलं. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं पीसीबीने म्हटलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सर्फराज अहमदकडे तीनही प्रकारातील क्रिकेट संघाचे नेतृत्व आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र, त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचे रँकिंग घसरले. नुकत्याच झालेल्या लंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत घरच्या मैदानावर त्यांना एकही सामना जिंकता आला नाही.

VIDEO : राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या