16 नोव्हेंबर संपूर्ण देश भावुक झाला होता; जेव्हा गॉड ऑफ क्रिकेट...

16 नोव्हेंबर संपूर्ण देश भावुक झाला होता; जेव्हा गॉड ऑफ क्रिकेट...

आजपासून 6 वर्षापूर्वी संपूर्ण देश भावुक झाला होता. अर्थात फक्त भारतातील नाही तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक दु:ख होते.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर: आजपासून 6 वर्षापूर्वी संपूर्ण देश भावुक झाला होता. फक्त भारतातील नाही तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक दु:ख होते. एक दोन नव्हे तर तब्बल 25 वर्ष ज्या एका खेळाडूसाठी प्रेक्षक मैदानात सामना पाहण्यासाठी जात असत आणि ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी कोट्यवधी लोक टीव्ही समोरून उठायचे नाहीत अशा 'गॉड ऑफ क्रिकेट' म्हणू्न ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (16 नोव्हेंबर) करिअरमधील अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

मुंबईतील वानखेडे मैदानावर 14 ते 16 नोव्हेंबर या काळात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना झाला होता. भारताने हा सामना 3 दिवसातच जिंकला. सचिनने या सामन्यात 118 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या होत्या. या सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि 126 धावांनी जिंकत सचिनला शानदार अशी निरोपाची भेट दिली. पण या सामन्यात जरी भारताने शानदार विजय मिळवला असला तरी तो संपल्यानंतर मात्र अनेकांच्या डोळ्यात पाणी होते.

अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात राहील; सचिन... सचिन...

या सामन्यात जेव्हा सचिन फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याने चेंडू खेळण्याआधी प्रथम खेळपट्टीला नमस्कार केला. ज्या मैदानावरून सचिनने करिअरची सुरुवात केली होती, त्याच मैदानावर हजारो चाहत्यांच्या आणि कुटुंबियांच्या सोबत तो क्रिकेटला निरोप देत होता. या सामन्यानंतर सचिनने केलेले भाषण देखील तितकेच भावनिक होते. तो म्हणाला, माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत सचिन.. सचिन.. हे चाहत्यांचे आवाज सतत ऐकू येतील.

नोव्हेंबर महिन्यात पदार्पण आणि नोव्हेंबर महिन्यातच निवृत्ती

15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या सचिनने पुढील 24 वर्षे देशाचे प्रतिनिधित्व केले. सचिनने कसोटीमधील पहिले शतक इंग्लंडविरुद्ध मॅनचेस्टर येथे 1990मध्ये केले. सचिनने तेव्हा नाबाद 119 धावांची खेळी केली होती. त्यानंतर सचिनने सिडनी येथे जानेवारी 1992मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 148 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे सचिनने करिअरची सुरुवात 15 नोव्हेंबर रोजी केली होती आणि निवृत्ती 16 नोव्हेंबर रोजी घेतली.

उगाच नाही 'गॉड ऑफ क्रिकेट'

सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. अर्थात हे देवत्व उगाच नाही मिळाले. सचिनच्या विक्रमांवर नजर टाकली ती याची प्रचिती येते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 कसोटी सामन्यात 53.78च्या सरासरीने 15 हजार 921 धावा केल्या आहेत. यात 51 शतक आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीमध्ये नाबाद 248 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. तर वनडेत त्याने 463 सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेच्या इतिहासातील पहिले द्विशतक झळकावण्याचा पराक्रम सचिनने केला आहे. नाबाद 200 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम देखील सचिनच्या नावावर आहे. वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यातील अनेक विक्रम आज देखील कायम आहेत.

First published: November 16, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading