मुंबई, 22 एप्रिल: सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) फॅन्ससाठी 22 एप्रिल हा दिवस खास आहे. याच दिवशी 1998 साली सचिननं शारजामध्ये (Sharjah) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 131 बॉलमध्ये 143 रनची वादळी खेळी केली होती. त्या रात्री भारताची बॅटींग सुरु असताना शारजामध्ये वाळूचं वादळ (Desert Storm) आलं होतं. त्या वादळामुळे मॅच काही काळ थांबवावी लागली. पण या वादळानंतर सचिनच्या बॅटचं वादळ क्रिकेट मैदानात आलं. त्याचा ऑस्ट्रेलियन टीमला मोठा तडाखा बसला.
भारतासाठी निर्णायक सामना
भारत-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात शारजामध्ये सुरु असलेल्या कोका कोला कप ( Coca- Cola Cup) स्पर्धेतील तो शेवटचा साखळी सामना होता. भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियावर विजय किंवा न्यूझीलंडचा रन-रटे पार करणे या दोनपैकी एका गोष्टीची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह वॉ (Steve Waugh) नं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली. मायकल बेवन (101) आणि मार्क वॉ (81) या दोघांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 285 रनचं लक्ष्य ठेवलं.
सचिनचा धडाका
भारताला ती मॅच जिंकण्यासाठी 285 तर फायनलमध्ये जाण्यासाठी 254 रनची गरज होती. सचिननं आक्रमक सुरुवात केली. पण सौरव गांगुली (Sourav Ganguly) झटपट आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या नयन मोंगियानं सचिनला साथ दिली. त्या दोघांनी भारताचा स्कोअर 100 च्या पुढं नेला.
सचिननं 57 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अचानक पडझड सुरु झाली. सुरुवातीला नयन मोंगिया 35 रन काढून आऊट झाला. त्यापाठोपाठ अझहरुद्दीन आणि अजय जडेजा देखील झटपट परतले. भारताची अवस्था 4 आऊट 143 अशी असताना शारजातील वाळवंटात वाळूचं वादळ आलं. त्यामुळे मॅच थांबवावी लागली.
सचिनचं Desert Storm
वाळूच्या वादळानंतर मॅचमधील समीकरण बदललं. आता भारताला मॅच जिंकण्यासाठी 46 ओव्हरमध्ये 276 हे नवं लक्ष्य मिळालं. तर फायनलला जाण्यासाठी 46 ओव्हरमध्ये 237 रन करणे आवश्यक होते. सचिनसाठी पहिल्यापेक्षा अवघड परिस्थिती होती. पण त्यामुळे तो डगमगला नाही.
शारजातील वाळूचं वादळ थांबलं असलं तरी सचिनच्या बॅटमधून वादळ सुरु झालं होतं. त्यानं मैदानाच्या चारही बाजूनं फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच बॉलर्सची धुलाई करत 43 व्या ओव्हरमध्येच भारताची फायनलमधील जागा निश्चित केली.
( वाचा: On This Day : IPL चा झाला जन्म, पहिल्याच मॅचमध्ये वेगवान शतकाचा विक्रम)
सचिन 43 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. तोपर्यंत त्यानं 131 बॉलमध्ये 143 रन केले होते. सचिन आऊट झाल्यानंतर भारताला विजयासाठी 18 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता होती. उर्वरित बॅट्समन्सना ते लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. भारताचा 26 रननं पराभव झाला. पण, सचिनच्या आक्रमक शतकामुळे भारतानं फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोन दिवसांनी 24 एप्रिल रोजी सचिनच्या वाढदिवशी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत कोका-कोला कप स्पर्धेचं विजेतेपदही पटकावलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.