• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • आजच्याच दिवशी बदललं भारतीय क्रिकेट, ही ऐतिहासिक घटना प्रत्येक भारतीयाच्या मनात!

आजच्याच दिवशी बदललं भारतीय क्रिकेट, ही ऐतिहासिक घटना प्रत्येक भारतीयाच्या मनात!

13 जुलै हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील (History of Indian Cricket) अतिशय खास दिवस आहे. 2002मध्ये याच दिवशी, सौरव गांगुलीच्या नेतृत्वात (Captain Saurav Ganguly) क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर (Lords) भारतानं इतिहास रचला होता.

  • Share this:
मुंबई, 13 जुले: 13 जुलै हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील (History of Indian Cricket) अतिशय खास दिवस आहे. 2002मध्ये याच दिवशी, सौरव गांगुलीच्या नेतृत्वात (Captain Saurav Ganguly) क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर (Lords) भारतानं इतिहास रचला होता. भारतानं नॅटवेस्ट वन-डे मालिकेतील अंतिम सामना जिंकला होता. या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे शिल्पकार होते अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि मोहम्मद कैफ (Mohamad Kaif). त्यांनी अफलातून खेळ करत ही विजयश्री खेचून आणली होती. इंग्लंडचं 326 रन्सचं आव्हान यशस्वीपणे गाठत भारतीय टीमने या दोन खेळाडूंच्या सहकार्यानं हा चमत्कार घडवला होता. आजही क्रिकेट रसिकांच्या मनावर या सामन्याचं गारुड कायम आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कॅप्टन नासिर हुसेन (Captain Nasir Hussain) यानं नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. सलामीवीर मार्कस ट्रेसकॉथिक आणि कॅप्टन हुसेन यांनी सेंच्युरी ठोकली. दुसर्‍या विकेटसाठी 185 रन्सची भागीदारी करून दोघांनी इंग्लंडला जोरदार सुरुवात करून दिली. मार्कसने 100 बॉल्समध्ये 7 फोर आणि 2 सिक्स ठोकले तर हुसेनने 128 बॉल्सचा सामना करत 10 फोर मारले होते. अँड्र्यू फ्लिंटॉफने 32 बॉल्समध्ये 2 फोर आणि एका सिक्ससह एकूण 40 रनचे योगदान दिले. भारतीय बॉलर्समध्ये झहीर खाननं 3 विकेट घेतल्या तर आशिष नेहरा आणि अनिल कुंबळेनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय टीमने बॅटिंगला सुरुवात केली, मात्र 326 रन्सचं लक्ष्य गाठणं फार अवघड वाटत होतं. वीरेंद्र सेहवाग आणि कॅप्टन सौरव गांगुलीने पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली आणि भारताच्या आशा उंचावल्या. मात्र टीम 114 रन्सवर असताना या दोघांच्या विकेट्स गेल्या. त्यानंतर 166 रन्स होईपर्यंत निम्मी टीम पॅव्हेलियनवर परतली होती. अशा बिकट परिस्थितीत युवराज सिंग आणि 19 वर्षांखालील विश्वविजेत्या टीममधून आलेल्या मोहमद कैफने सामन्याची सूत्रे हाती घेतली आणि मग त्यांनी जो काही चमत्कार दाखवला त्यानं सगळं जग अचंबित झालं. सहाव्या विकेटसाठी या दोघांनी 121 रनची भागीदारी केली. युवराजनं 63 बॉल्समध्ये 9 फोर आणि 1 सिक्स मारून 69 धावा केल्या, आणि तो पॅव्हिलियनमध्ये परतला. कैफनं मात्र शेवटपर्यंत मैदान सोडलं नाही. त्यानं 109 बॉल्सच्या नाबाद खेळीत 6 फोर आणि 2 सिक्स मारल्या आणि 87 रन्स केल्या. त्याला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. भारताने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 49 ओव्हर्स आणि 3 बॉल्समध्येच आपलं लक्ष्य साध्य केलं. एक सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी यांच्या मदतीनं 7 सामन्यांत एकूण 362 रन्स करणारा इंग्लंडचा मार्क्स ट्रेसकॉथिक मालिकावीर ठरला. हा सामना भारतानं जिंकला आणि सर्वत्र जल्लोषाची एकच लहर उसळली. इंग्लंडच्या टीमसाठी तर हा मोठा धक्का बसला होता. भारतीय टीमचा कॅप्टन सौरव गांगुलीने तर लॉर्ड्सच्या मैदानातील गॅलरीत आपला टी शर्ट काढून हवेत फिरवत भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला आणि विजयासोबतच दादाने केलेला हा जल्लोषही क्रिकेटच्या इतिहासात नोंदला गेला.
First published: