नवी दिल्ली, 21 डिसेंबर: चार वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलेला संघ चेन्नई सुपर किंग्सने (CSK) ओडिशाचा (Odisha Cricket Team) फलंदाज सुभ्रांशू सेनापतीला (Subhranshu Senapati) निवड चाचणीसाठी बोलावले आहे. त्यामुळे सध्या क्रिकेट जगतात त्याच्याच नावाची चर्ची पाहायला मिळत आहे. मात्र, सीएसकेच्या चाहत्यांना सुभ्रांशु सेनापति कोण आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुभ्रांशू सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याने सात सामन्यात 275 धावा केल्या आहेत. हा उजव्या हाताचा फलंदाज ओडिशासाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
8 डिसेंबरला त्याने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आंध्र प्रदेश विरुद्ध शतक झळकावले होते. त्याच्या शतकामुळे संघाची धावसंख्या 278- 5 अशी झालेली. ओडिशाने तो सामना 63 धावांनी जिंकला. त्याने विदर्भ आणि हिमाचल प्रदेश विरुद्ध अर्धशतक केले होते. ओडिशा संघ 5 सामन्यात 3 विजय मिळवून एलिट गट अ मध्ये चौथ्या स्थानावर होता आणि त्यामुळेच पुढच्या फेरीत नाही जाऊ शकला.
सेनापतीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्याने पाच सामन्यात 27.60 च्या सरासरीने 116.94 च्या स्ट्राईक रेटने 138 धावा केलेल्या. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश होता. त्याने 2017 मध्ये पदार्पण केल्यापासून 26 टी-२० सामन्यांमध्ये 28.95 च्या सरासरीने 637 धावा केल्या त्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
ओडिशा क्रिकेट असोसिएशन (ओसीए) संजय बेहरा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील त्याच्या अलीकडील कामगिरीमुळे त्याला आयपीएलच्या मागील विजेत्याने चाचणीसाठी बोलावले आहे.
सीएसकेने (CSK) आयपील मेगा लिलाव 2022 साठी 4 खेळाडूंना रिटेन केलं. रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) सर्वात जास्त किंमत म्हणजेच 16 कोटी, तसेच कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) 12 कोटी, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) 8 कोटी तर सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) 6 कोटी रुपयांत रिटेन केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Ipl 2022, Ipl 2022 auction, MS Dhoni