मुंबई, 24 फेब्रुवारी : 'वर्ल्डकपबद्दल मी केलेलं विधान सचिनविरोधात असल्याची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. पण,मी सचिनविरोधात कोणतंही विधान केलं नाही. मी केवळ भारतानं वर्ल्डकप जिंकावा एवढंच म्हटलं होतं. मी आणि सचिन मागील 25 वर्षापासून चांगले मित्र आहोत आणि आमची मैत्री कायम राहिलं', असं ट्विट भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं केलं आहे.
A lot of people in the media is trying to put my statement against sachin s when I said “I want the World Cup”My response has got nothing to do with his statement, nor is my statement against his .. he is, has been and will be one of my best friends for last 25 years @sachin_rt
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात क्रिकेटचा सामना खेळावा की नाही? याबद्दल सौरव गांगुलीनं मत व्यक्त करताना भारतानं वर्ल्डकप जिंकावा असं म्हटलं होतं. तर, सचिननं पाकिस्तानविरोधात मॅच न खेळता पाकिस्तानला दोन गुण का बहाल करा?, असा सवाल ट्विटरवर केला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये सचिन विरूद्ध गांगुली असा वाद दाखवला गेला. यावर आता सौरव गांगुलीनं ट्विटरवरून आपली बाजू मांडली आहे.
काय म्हणाला होता सचिन?
'वर्ल्डकपमध्ये न खेळता पाकिस्तानला दोन पॉईंट देण्यामध्ये काय अर्थ आहे? त्यापेक्षा पाकिस्तानचा पराभव करा आणि त्यांची जागा त्यांना दाखवून द्या. वर्ल्डकपचा इतिहास पाहता भारतानं पाकिस्तानला कायम चारी मुंड्या चित केल्या आहेत' असं मत सचिननं ट्विटरवर व्यक्त केलं होतं.
दरम्यान, सचिनच्या या ट्विटनंतर समाजमाध्यमांवर उलट सुलट प्रतिक्रिया देखील दिल्या गेल्या होत्या. काहींनी तर अगदी देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल मारली होती. सध्या भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट खेळावं की नाही? यावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया पाहायाला मिळत आहेत.
काय वाटतं कोहलीला?
दरम्यान, यावर कर्णधार विराट कोहलीनं मात्र सरकार घेईल तो निर्णय मान्य असेल असं म्हटलं आहे. बीसीसीआयनं देखील सरकारच्या निर्णयाचा आदर करू असं म्हटलं आहे.
पाकविरोधात भारत आक्रमक
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहेत. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात कर लावण्यात आला आहे. तर, गुरूवारी रावी नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे. दरम्यान पाकच्या दुटप्पीपणाबद्दल आता भारत संयुक्त राष्ट्रसंघात देखील आवाज उठवणार आहे. दरम्यान, फ्रान्स आणि चीननं देखील भारताला आता पाठिंबा दिला आहे.