मुंबई, 15 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या कॅप्टन्सीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहेत. विराटने (Virat Kohli) टी-20 टीमच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्यानंतर त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं. विराटऐवजी रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदाची नवी जबाबदारी देण्यात आली. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर विराट कोहली नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या, तसंच तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) जाण्यासाठी एक दिवस उशीरा टीममध्ये दाखल झाला. यानंतर रोहित शर्मा दुखापतीमुळे टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला, तर विराट दक्षिण आफ्रिकेतली वनडे सीरिज खेळणार नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यामुळे विराट आणि रोहित यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने आज पत्रकार परिषद घेतली आणि आपण वनडे सीरिजसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं. विराटने रोहितसोबतच्या वादांच्या चर्चांना पूर्णविराम दिला असला तरी विराटचा नेमका वाद रोहितबरोबर नसून गांगुलीशी (Sourav Ganguly) आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
टी-20 कॅप्टन्सीवरून वेगळी वक्तव्यं
गेल्या काही दिवसांपासून गांगुली आणि आज विराटने केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद विराट आणि गांगुलीमध्ये तर नाही ना? अशी शंका येऊ शकते. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने टी-20 कॅप्टन्सीबाबत गांगुलीने सांगितलेला दावाच खोडून काढला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाला होता. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वेगळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं.
टीम निवडीच्या वक्तव्यावरूनही विरोधाभास
रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम निवडीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. टीम इंडियाची निवड निवड समिती करते, यामध्ये मी किंवा कर्णधार मत देऊ शकत नाही, असं धक्कादायक वक्तव्य शास्त्रींनी केलं होतं. पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या सांगण्यावरूनच आर.अश्विनचं चार वर्षांनी टीममध्ये पुनरागमन झालं, असं गांगुली म्हणाला.
विराटशिवायही जिंकलो
टीम इंडियातली कॅप्टन्सी आणि विराट-रोहितमधल्या वादाची चर्चा सुरू असतानाच गांगुलीने केलेल्या आणखी एका वक्तव्यामुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. विराट कोहली ही आमची मोठी ताकद आहे, पण विराट नसतानाही रोहितने भारताला ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत, असं विधान गांगुलीने केलं होतं. गांगुलीचं हे वक्तव्य म्हणजे त्याने विराटला दिलेला सूचक इशारा असल्याचंही बोललं गेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Sourav ganguly, Team india, Virat kohli