20 फेब्रुवारी : स्पाॅट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट क्षेत्राला काळ डाग पडला होता. पण, आता क्रिकेट जगताची आणखी एक काळी बाजू समोर आली आहे. न्यूज18 नेटवर्कने केलेल्या स्टिंग आॅपरेशन 'क्लीन बोल्ड' मध्ये क्रिकेटच्या नावाने पैसे उकळणाऱ्या निवड समितीच्या सदस्यांची पोलखोल झाली आहे.
नेटवर्क18 च्या टीमने देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील क्रिकेट असोसिएशनची भेट घेतली. पहिली भेट झाली ती बिहार क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे नीरज कुमार यांची. नीरज कुमार यांच्याकडे एखाद्या खेळाडूला रणजी आणि आयपीएलमध्ये खेळवायचे आहे, त्यासाठी काय करता येईल? अशी विचारणा करण्यात आली होती. नीरज कुमार यांनी दिलेलं उत्तर हे धक्कादायक होतं. रणजी आणि आयपीएलमध्ये खेळवणे हे कोणतेही अवघड काम नाही. खेळाडू हा बिहार येथील राहणार नसला तरी यात कोणताही फरक पडत नाही. तो दिल्लीतला असला तरी आपण त्याला बिहार टीममधून खेळवू शकतो. जर या खेळाडूला खेळवायचे असेल तर तुम्हाला 35 लाख रुपये द्यावे लागतील, अशी लाचच नीरज कुमार यांनी मागितली.
या स्टिंग आॅपरेशनमध्ये झारखंड क्रिकेट असोसिएशनचाही पर्दाफाश झाला आहे. मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या निवड समितीच्या व्यवस्थापकांचा लाचखोर चेहरा या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आला आहे.
दरम्यान, आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनीही या स्टिंग आॅपरेशनची दखल घेतली आहे. 'या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून योग्य ती कारवाई केली जाईल', असं आश्वासन त्यांनी दिले आहे.
===================