मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ ODI: पहिल्याच वन डेत पाहा कुणी दिला 'गब्बर'ला दगा? 'या' कारणामुळे हरली टीम इंडिया

Ind vs NZ ODI: पहिल्याच वन डेत पाहा कुणी दिला 'गब्बर'ला दगा? 'या' कारणामुळे हरली टीम इंडिया

पहिल्या वन डेत लॅथम-विल्यमसनची निर्णायक भागीदारी

पहिल्या वन डेत लॅथम-विल्यमसनची निर्णायक भागीदारी

Ind vs NZ ODI: ऑकलंडच्या पहिल्या वन डेत तब्बल 300 पेक्षा जास्त धावा करुनही टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. भारताची कमकुवत गोलंदाजी हे भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ऑकलंड, 25 नोव्हेंबर: शिखर धवनच्या टीम इंडियानं ऑकलंडच्या पहिल्या वन डेत टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर 307 धावांचं आव्हान ठेवलं खरं पण किवींसमोर त्यांच्या घरच्या मैदानात हे आव्हान पुरेसं ठरलं नाही. त्यात कॅप्टन केन विल्यमसन आणि टॉम लॅथमनं चौथ्या विकेटसाठी केलेल्या निर्णायक द्विशतकी भागीदारीमुळे न्यूझीलंडचा विजय सोपा झाला. न्यूझीलंडनं 307 धावांचं आव्हान विकेट्सच्या मोबदल्यात आरामात पार केलं. या विजयासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण प्रश्न असा आहे की 306 धावा स्कोअर बोर्डवर लागूनही टीम इंडिया का हरली?

टीम इंडिया का हरली?

भारतीय फलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं होतं. पण टीम इंडियाच्या बॉलर्सना मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं. आणि हेच भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. भारतीय बॉलर्सनी पहिल्या 20 ओव्हर्समध्ये तीन विकेट घेतल्या होत्या. पण त्यानंतर विल्यमसन आणि लॅथमला रोखणं भारताच्या एकाही बॉलरला जमलं नाही. त्यामुळे भारताला हा सामना गमावण्याची वेळ आली. शार्दूल ठाकूर, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल या आघाडीच्या बॉलर्सनी सहापेक्षा जास्तच्या इकॉनॉमीनं धावा बहाल केल्या. वन डे पदार्पण करणाऱ्या अर्शदीपनं भारताकडून सर्वाधिक धावा दिल्या. त्याच्या 8.1 ओव्हरमध्ये 68 धावा किवी फलंदाजांनी वसूल केल्या.

विल्यमसन आणि लॅथमची द्विशतकी भागीदारी

तीन बाद 88 वरुन केन विल्यमसन आणि टॉम लॅथमनं न्यूझीलंडचा डाव पुढे नेला.  सुरुवातीला एकेरी दुहेरी धावांवर भर देत या दोघांनी स्कोअर बोर्ड हलता ठेवला. पण सेट झाल्यानंतर या जोडीनं भारतीय गोलंदाजी फोडून काढली. विल्यमसननं नाबाद 94 तर लॅथमनं 145 धावांची दमदार इनिंग केली. लॅथमची खेळी त्याच्या आजवरच्या वन डे कारकीर्दीतली सर्वोत्तम खेळी ठरली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी केली. कॅप्टन विल्यमसननं अखेर विजयी चौकार लगावला.

306 धावाही अपुऱ्या

त्याआधी कॅप्टन शिखर धवनची आणि शुभमन गिलची शतकी सलामी आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 300 धावांचा टप्पा ओलांडला. धवननं वन डे क्रिकेटमधला आपला फॉर्म कायम ठेवताना 72 धावा फटकावल्या. तर शुभमन गिलनंही 50 धावांची खेळी साकारली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर श्रेयस अय्यरला नशीबाची साथ मिळाली आणि त्यानं 80 धावांचं योगदान दिलं. त्यात संजू सॅमसन (36) आणि वॉशिंग्टन सुंदरनंही (37) फटकेबाजी केली. त्यामुळे भारतानं 50 ओव्हर्समध्ये 7 बाद 306 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Shikhar dhawan, Sports, Team india