मुंबई, 24 जानेवारी : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक खेळाडू आपला मोर्चा अंपायरिंगकडे वळवल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं असेल, पण क्रिकेट खेळत असतानाच अंपायर होण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्चमध्ये हेगले ओव्हल मैदानात क्रिकेट टीम आणि रग्बी टीम यांच्यात सामना झाला. या मॅचमध्ये क्रिकेट टीमचं नेतृत्व स्टीफन फ्लेमिंगने केलं, तर रग्बी टीमचं नेतृत्व सर ग्राहम हेनरी यांच्याकडे होतं. डॅनियल व्हिटोरीने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या भन्नाट बॉलिंगमुळे क्रिकेट टीमने ही मॅच दोन रनने जिंकली. जगप्रसिद्ध अंपायर बिली बाऊडेन यांच्यासोबत न्यूझीलंडचा ऑल राऊंडर जिमी नीशम (Jimmy Neesham) यानेही या मॅचमध्ये अंपायरिंग केली. अंपायर म्हणून जिमी नीशम पहिल्यांदाच मैदानात उतरला होता.
सोशल मीडियावरही नीशम त्याच्या हटके ट्विटमुळे चर्चेत असतो. मागच्याच आठवड्यात त्याच्या बोटाचं ऑपरेशन झालं होतं, या दुखापतीतून आता तो सावरत आहे.
दोन रनने क्रिकेट टीमचा विजय
रग्बी टीमविरुद्ध झालेल्या या मॅचमध्ये क्रिकेट टीमने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर हामीश मार्शल आणि पीटर फुल्टनने 8 ओव्हरमध्ये 62 रन केले. एकवेळ क्रिकेट टीम 200 रनचा आकडा पार करेल, असं वाटत होतं, पण रग्बी टीमने शानदार बॉलिंग करत क्रिकेट टीमला 20 ओव्हरमध्ये 189-5 या स्कोअरवर रोखलं. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या रग्बी टीमची सुरूवातही चांगली झाली. त्यांच्या ओपनिंग जोडीने 74 रनची पार्टनरशीप केली.
रग्बी टीमला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 8 रनची गरज होती, पण डॅनियल व्हिटोरीने जबरदस्त बॉलिंग करत शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. रग्बी टीमने एक फोर मारली, तरीही हा सामना त्यांना 2 रनने गमवावा लागला.