मुंबई, 16 जून : कोरोनामुळे अर्ध्यातच स्थगित झालेल्या आयपीएलचे (IPL 2021) उरलेले सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवण्याचं बीसीसीआयने (BCCI) ठरवलं आहे. युएईमध्ये आयपीएलचे उरलेले सामने खेळवले जातील, पण त्याआधीच स्पर्धेसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यातली सीरिज सप्टेंबरच्या मध्यात सुरू झाली तर खेळाडू देशाला प्राथमिकता देतील अशी अपेक्षा आहे, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष ट्रेव्हर होन्स म्हणाले. आयपीएलचे उरलेले सामने याच ट्राय सीरिजदरम्यान होणार आहेत.
ऑस्ट्रेलियाची टीम आता वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे, पण टी-20 वर्ल्ड कपआधाी ऑस्ट्रेलियन बोर्ड आणखी एका टी-20 ट्राय सीरिजसाठी आग्रही आहे. जर ही सीरिज झाली तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत.
क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूशी बोलताना ट्रेव्हर होन्स म्हणाले, 'खेळाडूंनी राष्ट्रीय टीमला प्राधान्य द्यावं, अशी आमची इच्छा आहे, पण अंतिम निर्णय खेळाडूंना घ्यायचा आहे. यावर अजूनतरी आम्ही लक्ष दिलेलं नाही, तसंच खेळाडूंनीही यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.'
ही ट्राय सीरिज झाली तर बीसीसीआय आणि आयपीएल टीमसमोर आणखी अडचणी निर्माण होतील, कारण आधीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपले खेळाडू आयपीएल खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानचे खेळाडूही ट्राय सीरिज खेळले तर आयपीएलमध्ये फक्त न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूच असतील. श्रीलंकेच्या कोणत्याच खेळाडूला यंदाच्या आयपीएल लिलावात विकत घेण्यात आलं नाही, तर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.