मुंबई, 25 मे : आयपीएल 2023मध्ये एलिमिनेटर सामन्यात लखनऊविरुद्ध मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवला. एम चिदंबरम स्टेडियमवर झालेला हा सामना मुंबई इंडियन्सने 81 धावांनी जिंकला. यासह मुंबईने आयपीएल फायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं. शनिवारी मुंबईचा सामना गुजरातशी होणार असून यात विजेता संघ फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लढणार आहे. लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने मुंबईविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. मात्र या कामगिरीनंतरही त्याला ट्रोल केलं जात आहे. त्याला झोमॅटो एपने लखनऊचा पराभव होत असताना एक फोटो शेअर करत ट्रोल केलंय.
लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली कामगिरी केली. त्याने चार षटकात 38 धावा दिल्या. मात्र यात त्याने रोहित शर्मा, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना बाद केलं. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या आणि क्षेत्ररक्षकांच्या चपळ कामगिरीमुळे लखनऊचा डाव 101 धावातच आटोपला. लखनऊच्या पराभवानंतर झोमॅटोने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. यात टीव्हीवर मॅच सुरू असून त्यात नवीन उल हक शेवटी येऊन फलंदाजी करत असल्याचं दिसतं.
मुंबईची ढिसाळ सुरुवात ते चॅम्पियन होण्याच्या मार्गावर, 5 मुद्दे ठरले महत्त्वाचे
झोमॅटोने मॅचसोबत एक आंब्याचा फोटो शेअर केला. त्यावर लिहिलं होतं की,'नॉट सो स्वीट मँगो." नवीन उल हकने विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. विराट बाद झाल्यावर आणि आरसीबीचा पराभव झाल्यावर त्याने एक आंब्याचा फोटो शेअर करताना स्वीट मँगो असं स्टोरीवर म्हटलं होतं.
मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 182 धावा केल्या. लखनऊ प्रत्युत्तरादाखल खेळताना पूर्ण 20 षटकेही खेळू शकले नाही. लखनऊचा संघ 101 धावात ऑलआऊट झाला. मुंबई इंडियन्सने सामना 81 धावांनी जिंकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.