मुंबई, 8 ऑक्टोबर : टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरन (muttiah murlidharan) याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच येणार आहे. 800 असं या बायोपिकचं नाव असणार आहे. मुरलीधरन याने टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट घेतल्यामुळे चित्रपटाचं नाव 800 ठेवण्यात आलं आहे. दक्षिणेतला अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे. तर एमएस श्रीपती या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
टेस्ट क्रिकेटमध्ये मुरलीधरनच्या नावावर सर्वाधिक 800 विकेट आहेत. मुरलीधरननंतर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने 708 विकेट घेतल्या. तामीळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मक्काल सेलवन नावाने ओळख असलेले विजय सेतुपती मुरलीधरनच्या रुपात दिसणार आहेत. 2016 साली आलेल्या सेतुपती आणि धर्मा दुराई या चित्रपटांमुळे विजय सेतुपती लोकप्रिय झाले.
या चित्रपटासाठी विजय सेतुपती यांनी मुरलीधरनसोबत काही वेळ घालवला, असल्याचीही चर्चा आहे. विजय सेतुपती यांच्याशिवाय या चित्रपटात आणखी कोण भूमिका साकारणार, याबाबतची घोषणा अजून करण्यात आलेली नाही.
मुथय्या मुरलीधरन याने 1992 साली त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. 18 वर्षांच्या या कारकिर्दीमध्ये टेस्टसोबतच मुरलीधरनने वनडेमध्यही सर्वाधिक 534 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 आणि 10 विकेट घेण्याचा विक्रमही मुरलीधरनच्याच नावावर आहे. भारताचा क्रिकेटपटू प्रग्यान ओझा मुरलीधरनची 800वी विकेट होती. श्रीलंकेच्या गेल मैदानात 2010 साली त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. हीच मॅच मुरलीधरनची शेवटची टेस्ट मॅच होती.
आयपीएल (IPL)मध्ये मुरलीधरन चेन्नई आणि बैंगलोरसाठी खेळला. सध्या तो हैदराबादच्या टीमचा बॉलिंग सल्लागार आहे.
क्रिकेटपटूंमध्ये एमएस धोनी याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आला होता. या चित्रपटात सुशांतसिंह राजपूत याने धोनीची भूमिका साकारली होती. तर लवकरच कपिल देव यांचा बायोपिकही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.