दुबई, 13 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स जबरदस्त कामगिरी करत आहे. या स्पर्धेत मुंबईने आतापर्यंत 7 सामन्यांत 5 विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर पॉईंट्स टेबलमध्ये देखील पहिल्या क्रमांकावर असून कर्णधार रोहित शर्मा याने संघाच्या या कामगिरीवर भाष्य केलं आहे. स्पर्धेच्या या महत्त्वाच्या टप्प्यात आता संघाला कामगिरी सुधारण्याची आणि चांगली कामगिरी टिकवून ठेवण्याची गरज आहे असं मत त्याने व्यक्त केलं आहे.
मुंबईच्या कामगिरीवर अधिक भाष्य करताना रोहित म्हणाला, ‘संघाने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली असून स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ही कामगिरी टिकवून ठेवण्याचं आमच्यासमोर आव्हान आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केल्यानंतर मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर 162 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. याविषयी मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरून रोहितनी मत व्यक्त केलं. ‘स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला हा फॉर्म टिकवून ठेवायचा आहे. त्याचबरोबर इतर संघांच्या तुलनेत आम्हाला उत्तम कामगिरी करून त्यांच्या पुढे राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी माहीत आहे. त्यामुळं ते सर्वजण पुढे येऊन उत्तम खेळत आहेत. आतापर्यंत आम्ही केलेलं नियोजन यशस्वी ठरलं असून यापुढे देखील ते यशस्वी ठरण्याची आशा आहे, असं त्यानी ट्विटमध्ये म्हटलंय.
रोहित शर्मा याने या स्पर्धेत आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत सामन्यात 216 धावा केल्या आहेत. पुढील सर्व सामने खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एन्जॉय करण्याबरोबरच आमचे कामगिरीवर देखील लक्ष असल्याचं त्यानं म्हटलं आहे. संघातील सर्व खेळाडूंचे एकमेकांशी चांगले बाँडिंग आहे. या सगळ्या वातावरणाचा संघाला फायदा होत असून खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत.
हे ही वाचा-धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा तरुण गुजरातमधला; पोलिसांना अटकेची सूचना
नुकतंच रोहितने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 150 सामने पूर्ण केले. याविषयी बोलताना रोहितने हा अविस्मरणीय प्रवास असल्याचं म्ह्टल आहे. खूपच उत्तम हा प्रवास झाला असून पाठिंबा देणाऱ्या सर्व खेळाडूंचे आणि व्यक्तींचे त्याने आभार मानले आहेत.