नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : सर्वाधिक वेळा आयपीएलचं (IPL) जेतेपद पटकावलेला मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2021 मध्ये संघाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सला पहिल्या 10 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले आहेत. गुणतालिकेत संघ 8 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. 11 व्या सामन्यात त्यांचा सामना आज पंजाब किंग्जशी आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने या सामन्यासाठी 2 बदल केले आहेत. इशान किशनला वगळण्यात आलं आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, संघात बदल करणे हा एक कठीण निर्णय होता. आम्ही काही चुका केल्या आहेत. आता आम्हाला परत यायलाच हवे. मात्र, ईशान किशनच्या बाहेर पडल्यानंतर त्याच्याबाबतीत आता अनेक उलट-सुलट प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टी -20 विश्वचषकासाठी त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे, असंही सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय टी -20 विश्वचषक संघात बदल करू शकते.
हे वाचा - महेंद्र सिंह धोनी ‘या’ दिवशी करणार IPL ला अलविदा; माजी खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी
इशान किशन या सामन्यापूर्वी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. इशानला 3 डावांमध्ये अनुक्रमे 11, 14 आणि 9 धावांसह फक्त 34 धावा करता आल्या. सध्याच्या आयपीएल हंगामात तो मुंबईसाठी 8 सामन्यांत 13 च्या सरासरीने फक्त 107 धावा करू शकला. त्याची सर्वात मोठी धावसंख्या 28 धावा होती. स्ट्राइक रेट देखील फक्त 87 होता. गेल्या मोसमात त्याने यूएईमध्ये भरपूर धावा केल्या. त्याने 14 सामन्यांमध्ये 57 च्या सरासरीने 516 धावा केल्या. 4 अर्धशतके केली होती. स्ट्राइक रेट 146 होता. मुंबईचा दुसरा फलंदाज सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवरही सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दोन्ही संघांचे प्लेइंग -11 हे असे -
मुंबई इंडियन्स -रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
पंजाब किंग्स - केएल राहुल, मनदीप सिंग, ख्रिस गेल, एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Mumbai Indians