'तुच खरा मॅच विनर', मलिंगाच्या निवृत्तीवर भावुक झाला रोहित!
Lasith Malinga Retirement : बांगलादेश विरोधात झालेल्या आपल्या शेवटच्या सामन्यात मलिंगानं तीन विकेट घेतल्या.

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगानं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 16 वर्ष श्रीलंकेसाठी खेळणाऱ्या मलिंगानं बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात विजय मिळवत निवृत्ती घेतली.

35 वर्षीय मलिंगानं आपल्या करिअरमध्ये 817 विकेट घेतल्या आहेत. यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 338, टी-20मध्ये 378 आणि टेस्टमध्ये 101 विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात मलिंगानं 3 विकेट घेत सर्वात जास्त विकेट घेण्याच्या यादीत भारतीय माजी गोलंदाज अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. बांगलादेश विरोधात मलिंगानं केवळ 38 धावा देत तीन विकेट घेतल्या.

मलिंगानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली असली तरी, तो आयपीएल खेळणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या मलिंगाबद्दल मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं एक भावुक होत ट्वीट केले आहे.

रोहित शर्मानं, "जर मला एक मॅच विनर खेळाडू निवडण्यास सांगितले तर मी तुझी निवड करेन. मुंबई इंडियन्ससाठी तु नेहमीच महत्त्वाचा राहिला आहेस. कर्णधार म्हणून महत्त्वाच्या क्षणी तु कधीच मला दबाव जाणवू दिला नाहीस. तुला तुझ्या भवितव्यासाठी शुभेच्छा", असे ट्वीट केले आहे.
First Published: Jul 27, 2019 01:15 PM IST