कडलूर, 27 ऑक्टोबर: भारतात क्रिकेटचे काही चाहते असे आहेत, की त्यांच्यासाठी त्यांचा आवडता खेळाडू देवाप्रमाणे असतो. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा सामना पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते काहीही करतात. भारतात क्रिकेट या खेळाचे आणि क्रिकेटर्सचे महत्त्व खूप आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी असा चाहतावर्ग मिळवला आहे, की चाहते त्यांच्यासाठी काही करण्यासाठी तयार होतात.
चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) गोपीकृष्णन या फॅनने त्याच्या घराला बाहेरून पिवळा रंग दिला आहे. त्याने आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट टीमच्या जर्सीचा पिवळा रंग देण्याबरोबरच धोनीचं चित्रही भिंतीवर रंगवून घेतलं आहे. धोनीने त्याच्या या चाहत्याला उत्तर दिलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये धोनी या चाहत्याचे आभार मानताना दिसून येत आहे. यामध्ये धोनी म्हणतो की, 'मी ही बातमी इंस्टाग्रामवर पहिली, हे खूप छान आहे. त्याचबरोबर हा केवळ माझा फॅन नसून चेन्नईचा सर्वांत मोठा फॅन आहे.'
Thala Dhoni's sweet reaction to the sweetest tribute!
याविषयी बोलताना धोनी म्हणाला, 'ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण यासाठी घरातील सर्व व्यक्तींची संमती घ्यावी लागते. ही काही सोशल मीडियावरील पोस्ट नाही की एका रात्रीत निघून जाईल. त्यांचं घर कायम याच रंगात राहणार आहे. त्यामळे या गोष्टीसाठी मी संपूर्ण कुटुंबाचे आभार मानतो.' तामिळनाडूमधील कडलूर जिल्ह्यातील गोपीकृष्णन नावाचा हा धोनीचा फॅन आहे. त्याने आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा रंग असणारा पिवळा रंग दिला आहे. त्याचबरोबर ‘Home of Dhoni Fan’ असं नावही त्याने घराला दिलं आहे.
गोपीकृष्णन हा दुबईमध्ये काम करत असून तो धोनीचा खुप मोठा चाहता आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात तो त्याच्या घरी भारतात आला आहे. याविषयी एका मुलाखतीत माहिती देताना त्याने सांगितले, या वर्षी धोनी निवृत्त झाला. त्यानंतर यावर्षी त्याने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन न केल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट दाखवण्यासाठी त्याने घराला असा रंग दिल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार घर रंगवण्यासाठी त्याने 1.5 लाख रुपये खर्च केला आहे. त्याचबरोबर घराच्या भिंतीवर चेन्नईच्या संघाची टॅगलाईन "Whistle Podu" देखील लिहिले आहे. दरम्यान यावर्षीच्या आयपीएलमध्ये सीएसेकची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई प्लेऑफमध्ये खेळताना दिसून येणार नाही. त्यामुळे सीएसके आणि धोनीचे अनेक चाहते नाराज आहेत.