मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

16 दिवस आणि 1400 किमी... धोनीच्या चाहत्याने हद्दच केली राव!

16 दिवस आणि 1400 किमी... धोनीच्या चाहत्याने हद्दच केली राव!

धोनीसाठी कायपण! चाहत्याने केला चालत प्रवास

धोनीसाठी कायपण! चाहत्याने केला चालत प्रवास

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे, पण धोनीची एक झलक पाहायला त्याचे चाहते कायमच आतूर असतात.

    रांची, 15 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे, पण धोनीची एक झलक पाहायला त्याचे चाहते कायमच आतूर असतात. मैदानात कायमच शांत राहणाऱ्या धोनीच्या चाहत्यांची संख्या त्याच्या निवृत्तीनंतरही कमी झालेली नाही. सोशल मीडियावरही धोनी खूप कमी ऍक्टिव्ह असतो, तरीही त्याची सोशल मीडियावरची क्रेझ कमी होत नाही. धोनीचा असाच एक चाहता 16 दिवस 1400 किमी चालून त्याला भेटण्यासाठी रांचीमध्ये पोहोचला. धोनीचा हा फॅन हरियाणाचा रहिवासी आहे. आपल्या गावापासून ते रांचीपर्यंत आपण चालत आल्याचा दावा या चाहत्याने केला आहे. 29 जुलैला त्याने या प्रवासाला सुरुवात केली आणि 16 दिवसांनी जवळपास 1400 किमी चालून तो रांचीला पोहोचला. टेलिग्राफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीचं नाव अजय गिल आहे. धोनीला घरी जाऊन भेटायचं हे निश्चित केलं होतं, असं 18 वर्षांचा अजय गिल म्हणाला. एवढी मेहनत करून अजय रांचीला आला तरी त्याला धोनीला भेटता आलं नाही, कारण धोनी आधीच आयपीएलसाठी (IPL 2021) चेन्नईला रवाना झाला आहे. अजय गिल आपल्या गावात सलूनमध्ये काम करतो, एवढच नाही तर त्याने आपला लूकही धोनीशी जोडला आहे. अजयने केसांना पिवळा, नारंगी आणि निळ्या रंगाने रंगवलं आहे. तसंच त्याने डोक्यावर धोनी आणि माही असं लिहिलं आहे. माझ्या सहकाऱ्याने मला हा लूक फुकटात करून दिल्याचं अजय सांगतो. सोनीपतवरून मी रांचीपर्यंत चालत आलो, कारण मला यावर धोनीची सही घ्यायची होती, म्हणून मला मित्राने हा लूक फुकटात करून दिला, अशी प्रतिक्रिया अजयने दिली. माझीही क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती, पण धोनीच्या निवृत्तीनंतर आपण क्रिकेट खेळणं सोडून दिल्याची प्रतिक्रिया अजयने दिली. आता धोनीला भेटण्याचं अजयचं स्वप्न आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, MS Dhoni

    पुढील बातम्या