धोनी तर दूरच पंतही नाही, टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार कोण?

धोनी तर दूरच पंतही नाही, टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार कोण?

भारताचा यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर असून त्याच्या जागी पंत अपयशी ठरत आहे त्यामुळं टी20 वर्ल्ड कपमध्ये कोण खेळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका भारताला जिंकता आली नाही. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. यामुळे मालिका बरोबरीत सुटली. त्याआधी भारताने विंडीजविरुद्ध तिनही प्रकारात मालिका विजय साजरा केला आहे. तरीही वर्ल्ड कपपासून भारतासमोर असलेला प्रश्न सुटलेला नाही. चौथ्या क्रमांकाचा आणि धोनीचा वारसदार कोण याचा प्रश्न अद्याप कायम आहे. जरी ऋषभ पंत सध्या धोनीच्या जागी खेळत असला तरी ऑस्ट्रेलियात पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्याच खांद्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धोनी मैदानापासून दूरच

वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधून बाहेर पडल्यानंतर भारताचा दिग्गज य़ष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी एकदाही मैदानावर दिसला नाही. त्यानं विश्रांती घेतली असून नोव्हेंबरपर्यंत आपण खेळू शकणार नसल्याची कल्पना त्यानं निवड समितीला दिली आहे. धोनी क्रिकेटपासून दूर आहे आणि त्याच्या जागी निवडकर्त्यांनी पंतवर विश्वास दाखवला आहेत. तर धोनीचे भविष्य काय ? निवड समितीने याआधीच स्पष्ट केलं आहे की, टी20 वर्ल्ड कपसाठी यष्टीरक्षक म्हणून धोनीला पहिली पसंती नसेल. त्यामुळं धोनी संघात असला तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये तेव्हाच खेळेल जेव्हा यष्टीरक्षक दुखापतीमुळं बाहेर असेल.

धोनी पंतला मार्गदर्शन कधी करणार?

धोनी संघाबाहेर असल्यानं त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती. मात्र, निवड समितीने धोनी इतक्यात निवृत्ती घेणार नाही असं म्हटलं होतं. धोनी पंतला मार्गदर्शन करण्याचं काम करेल आणि टी20 वर्ल्ड कपपर्यंत तो संघासोबत असेल असंही स्पष्ट केलं होतं. दरम्यान दुसरीकडं पंतने त्याच्या खराब फलंदाजीचा नमुना दाखवून टीकाकारांना आयती संधी दिली आहे. दरम्यानच्या काळात धोनी कधीच पंतसोबत मैदानावर दिसलेला नाही किंवा त्याच्याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

पंतला किती संधी

धोनीनंतर यष्टीरक्षक म्हणून निवड समितीनं ऋषभ पंतला पसंती दिली आहे. ऋषभ पंतने 11 कसोटी, 12 एकदिवसीय आणि 20 टी 20 सामने खेळले आहेत. मात्र, फलंदाजीत त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. आता हीच गोष्ट डोकेदुखी वाढवणारी आहे. विंडीजविरुद्ध पंतने दोन एकदिवसीय सामन्यात 30 धावा केल्या. तर तीन कसोटीत 58 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत त्यानं 23 धावा केल्या. त्यामुळं आता यापुढे पंतला किती संधी द्यायची असा प्रश्न निवड समितीसमोर निर्माण झाला आहे.

पंतसाठी आहेत पर्याय

दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी नुकतंच स्पष्ट केलं की, पंतवर असलेल्या जबाबदारीकडे आमचं लक्ष आहे. आम्ही तिनही प्रकारात पंतची जागा घेतील अशा खेळाडूंना तयार करत आहे. आमच्याकडं केएस भारत असून त्यानं इंडिया एसाठी चांगली कामगिरी करत आहे. तर मर्यादीत प्रकारच्या क्रिकेटमध्ये आमच्याकडं इशान किशन आणि संजू सॅमसन आहेत. निवड समितीनं एकप्रकारे पंतला दिलेला हा इशाराच आहे. जर यात इशान किशन, संजू सॅमसन यांनी स्वत:ला सिद्ध केलं तर पंतची जागा ते घेऊ शकतात. अशा परिस्थितीत टी20 वर्ल्ड कपमध्ये या दोघांपैकी एकजण यष्टीरक्षण करताना दिसल्यास नवल नाही.

दिग्गजांनी पंतला दिला इशारा

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं की, जर पंत खराब कामगिरी करत राहिला तर त्याला संघातून बाहेर बसावं लागेल. दुसरीकडं विराट कोहलीनं युवा खेळाडूंनी 4-5 संधीमध्येच सिद्ध करायला हवं असं म्हटलं होतं. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी पंतला बेजबाबदार आणि बेधडक यात फरक असतो असं समजावून सांगितलं होतं. तर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पंतची जागा घेण्यासाठी संजू सॅमसन पूर्णपणे तयार आहे असं म्हटलं होतं. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पंतला संधी मिळणार की साहा बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियात होणार ‘या’ पाच युवा खेळाडूंची एण्ट्री!

धोनीला शेअर केला गल्ली क्रिकेटचा अनुभव, VIDEO VIRAL

VIDEO : माझे पैसे द्या, भाजी विकणाऱ्या महिलाचा पीएमसी बँकेत आक्रोश

Published by: Suraj Yadav
First published: September 25, 2019, 10:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading