मुंबई, 3 जून : भारतीय टीम (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (England Tour) रवाना झाली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची इच्छा भारतीय टीमची असेल. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत 2-1 ने पराभव केला होता. हा विजय भारतासाठी खास होता कारण कर्णधार विराट कोहली दौरा अर्धवट सोडून घरी आला होता, तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल दुखापतींमुळे पूर्ण सीरिज खेळू शकले नव्हते. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ते हिरो झाले. यामध्ये फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचाही (Mohammad Siraj) समावेश होता.
25 वर्षांच्या मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये सिराजला खेळण्याची संधी मिळाली. मोहम्मद सिराज त्या सीरिजमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. त्याने एकूण 13 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजही कामगिरी खास होती, कारण ऑस्ट्रेलियात असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं, पण त्याने घरी न येता ऑस्ट्रेलियात राहूनच वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. कठीण काळामध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि इतर खेळाडूंनी सिराजला साथ दिली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वडिलांच्या निधनानंतर कोच रवी शास्त्री यांनी आपल्याला आत्मविश्वास दिल्याचं सिराज म्हणाला. 'जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा रवी सर आणि बॉलिंग कोच भरत अरुण सर दोघांनी माझं धैर्य वाढवलं. रवी सर माझ्याजवळ आले म्हणाले, तू टेस्ट मॅच खेळ, बघ तुला 5 विकेट मिळतील. तुझ्या वडिलांचे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत. मॅच संपल्यानंतर रवी सर खुश झाले आणि म्हणाले, बघ तुला म्हणालो होतो 5 विकेट मिळतील. कोचनेच असं धैर्य वाढवल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला,' अशी प्रतिक्रिया सिराजने दिली.
सिराजने आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच 5 विकेट घेत, रवी शास्त्रींचा त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. त्या मॅचमध्ये सिराजने पहिल्या इनिंगमध्ये 2 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट पटकावल्या. यानंतर ब्रिस्बेन टेस्टमध्येही त्याने 6 विकेट घेऊन भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सिराजची इंग्लड दौऱ्यासाठीही निवड झाली आहे. 18 जूनपासून सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही (World Test Championship Final) सिराज टीममध्ये दिसू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ravi shastri, Team india