मुंबई, 13 नोव्हेंबर : मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचं फूटबॉल प्रेम आज सगळ्यांना दिसलं. शिवाजी पार्कमध्ये अमित ठाकरे यांनी त्यांचं फूटबॉलचं स्किल दाखवून दिलं. मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क मैदानात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनसाठी अमित ठाकरे आले होते. त्यावेळी शिवाजी पार्क मैदानात फूटबॉल फुटी या संस्थेची मुलं फूटबॉल खेळत होती. या मुलांनी अमित ठाकरेंना फूटबॉल खेळण्याची विनंती केली. अमित ठाकरे यांनीही या मुलांच्या विनंतीला मान देऊन फूटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
काहीच दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांचा वडिल राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत टेनिस खेळतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवाजी पार्क जिमखान्यावरच राज ठाकरे आणि अमित ठाकरे टेनिस खेळायला गेले होते. अमित ठाकरे यांनी कॉलेजमध्ये असताना अनेक आंतर महाविद्यालीय फूटबॉल स्पर्धांमध्येही भाग घेतला होता.
ठाकरे कुटुंबाचं फूटबॉल प्रेम हे सर्वश्रुत आहे. अमित ठाकरेंचे चुलत भाऊ आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही फूटबॉलची आवड आहे. कोरोना व्हायरसमुळे अडचणीत आलेल्या देशातल्या एक हजार फूटबॉल प्रशिक्षकांना मदतीचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशन (WIFA) या संस्थेचे आदित्य ठाकरे पदाधिकारीही आहेत. ही संस्था महाराष्ट्रातल्या फूटबॉल मॅचवर नियंत्रण ठेवते. तसंच आदित्य ठाकरे मुंबई जिल्हा फूटबॉल असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.