बंगळुरू, 02 एप्रिल : मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. आरसीबीविरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सायंकाळी साडे सात वाजता एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्यात गेल्या अकरा वर्षांपासून मुंबई इंडियन्सची नको असलेली 'परंपरा' आता तरी खंडित होणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. विराट कोहलीच्या आरसीबी संघाविरोधात सामना जिंकून मुंबई इंडियन्स विजयी सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. २०१३ मध्ये पहिलं विजेतेपद जिंकल्यानंतर गेल्या दहा वर्षात पाच विजेतेपद पटकावली. मात्र या दहा वर्षात मुंबईला आयपीएलच्या हंगामातला पहिला सामना मात्र जिंकता आलेला नाही.
IPL 2023 : वडिलांनी दिलं ट्रेनिंग, मुलगा उतरला मैदानात; पदार्पणात गोलंदाजांची केली धुलाई
गतवर्षीच्या हंगामात मुंबईची कामगिरी अत्यंत खराब अशी होती. १४ सामन्यात फक्त चारच सामने मुंबई इंडियन्सला जिंकता आले होते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईचा संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली होता. २०२२ च्या हंगामात संघाकडे जसप्रीत बुमराह होता, पण यावेळी दुखापतीमुळे तो बाहेर असेल. दरम्यान, दिलासा देणारी बाब म्हणजे यावेळी संघात जोफ्रा आर्चर असणार आहे.
आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. आरसीबीच्या घरच्या मैदानावर विराट कोहली संघाच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्यासाठी उत्सुक असेल. आरसीबीच्या नेतृत्वाची धुरा फाफ डुप्लेसीच्या खांद्यावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2023, Rohit Sharma