मुंबई, 26 जून : मानसिक दबाव (stress) ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. यशस्वी व्यक्ती देखील त्याला अपवाद नाही. क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी खेळाडू सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) देखील हा दबाव सहन केला आहे. मॅचच्या आदल्या रात्री मला झोप लागत नसे. हा प्रकार तब्बल 10 ते 12 वर्षे सुरु होता असा धक्कादायक गौप्यस्फोट सचिननं एका मुलाखतीमध्ये केला आहे. तो दबाव काय होता? तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवलं याची देखील सविस्तर माहिती सचिननं या मुलाखतीमध्ये दिली आहे.
सचिननं 'टाईम्स ऑफ इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. "मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीमधील 10 ते 12 वर्ष मॅचच्या आदल्या रात्री झोपू शकत नव्हतो. मी अंथरुणावर सतत कुशी बदलत असे. माझ्या डोक्यात कायम मॅचचे विचार येत. एक दशकानंतर मला याची जाणीव झाली की मी याच पद्धतीनं मॅचला सामोर जाणार आहे. त्यानंतर मी या परिस्थितीशी झगडणे बंद केले. मी त्यानंतर मॅचच्या आदल्या रात्री टीव्ही पाहत असे तसंच मला बऱ्या वाटणाऱ्या सर्व गोष्टी करु लागलो." असे सचिनने सांगितले.
सचिननं केली मानसिक तयारी
सचिन तेंडुलकर मॅचपूर्वी फक्त शारीरिक नाही तर मानसिक तयारी देखील करत असे. सचिननं या तयारीबाबत म्हणाला की, " मी फक्त शारीरिक नाही तर मानसिक तयारी देखील करत असे. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत असे. तसंच दुसऱ्या दिवशी मॅचमध्ये कसं खेळेन याचा विचार करत होतो. त्या परिस्थितीमध्ये मी खूप काही शिकलो. लोकांच्या अपेक्षांचा विचार करायचा की स्वत:ची अपेक्षा पूर्ण करायची हा मोठा प्रश्न होता. काही दिवसांनी मी लोकांच्या अपेक्षांचा विचार करणे थांबवले. कारण, माझ्या मनात काय सुरु आहे,माझ्यावर किती दबाव आहे याची लोकांना कल्पना नव्हती. मी स्वत:ला नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी झोकून दिले होते," असे सचिनने स्पष्ट केले.
WTC Final : ऋषभ पंतच्या आऊट होण्यावर गावसकर नाराज, म्हणाले...
हा सर्व दबाव सहन केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकावण्याचा पराक्रम सचिननं केला आहे. सचिननं 200 टेस्ट आणि 463 वन-डेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्याने 34 हजारांपेक्षा जास्त रन काढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.