Home /News /sport /

'टीम बनवणं कठीण, बर्बाद करणं सोपं', विराटला हटवल्यामुळे भडकला भारतीय क्रिकेटपटू

'टीम बनवणं कठीण, बर्बाद करणं सोपं', विराटला हटवल्यामुळे भडकला भारतीय क्रिकेटपटू

Virat Kohli

Virat Kohli

भारताचा सध्याच्या काळातला सर्वोत्तम क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. विराटऐवजी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : भारताचा सध्याच्या काळातला सर्वोत्तम क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. विराटऐवजी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून रोहित शर्मा नव्या जबाबदारीमध्ये दिसेल. विराटला कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक मदन लाल (Madan Lal) यांनी टीका केली आहे. बीसीसीआयचा हा निर्णय योग्य नसल्याचं मदन लाल म्हणाले. बीसीसीआयने (BCCI) बुधवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून रोहित शर्मा आता वनडे टीमचाही कर्णधार असेल, असं घोषित केलं होतं. विराटने टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) आधीच आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं, पण आता बीसीसीआयने त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवलं आहे, पण असं करणं योग्य नसल्याचं मत मदन लाल यांनी मांडलं आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना मदन लाल म्हणाले, 'निवड समितीने याबाबत काय विचार केला, ते मला माहिती नाही. जर कोहली चांगले निकाल देत होता, तर मग त्याच्याकडेच ही जबाबदारी न ठेवण्याचा निर्णय का घेण्यात आला? खूप जास्त क्रिकेट होत असल्यामुळे त्याने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्याचं मी समजू शकतो. टी-20ची कॅप्टन्सी सोडून विराटला इतर दोन्ही फॉरमॅटवर लक्ष केंद्रीत करायचं होतं.' विराट कोहलीचं वनडे विजयाचं रेकॉर्ड 70 टक्के आहे, त्यामुळे अनेक चाहत्यांनीही त्याला वनडे टीमचा कर्णधार म्हणून कायम ठेवायला पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया दिली. दोन वर्षांनी 50 ओव्हरचा वर्ल्ड कप भारतात होत आहे, त्यामुळे वनडे टीमचं नेतृत्व विराटकडेच असायला पाहिजे होतं, असं मदन लाल म्हणाले. 'जर तुम्ही यशस्वी असाल आणि तरीही तुम्हाला हटवलं जात असेल, तर ते बोचतं. 2023 वनडे वर्ल्ड कपपर्यंत विराट कॅप्टन राहिल, असं मला वाटत होतं. एक टीम बनवणं कठीण असतं, पण बनवलेली टीम बर्बाद करणं सोपं असतं. कोहली टेस्ट टीमचा कॅप्टन होता तेव्हा धोनी वनडे आणि टी-20 टीमचा कर्णधार होता, कोहलीने दोन वर्षांपेक्षा जास्त काळ असं केलं,' असं वक्तव्य मदन लाल यांनी केलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या