लंडन, 25 जून: ICC Cricket World Cupमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये अपराजित राहण्याची परंपरा भारताने कायम ठेवली. या सामन्यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव तर पाकिस्तान संघावर टीका सुरु झाली होती. सर्व सामान्य क्रिकेट चाहते, मीडिया आणि माजी क्रिकेटपटूंनी देखील पाकिस्तान संघावर हल्ला चढवला होता. भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाक संघात दोन गट पडल्याची बातमी देखील आली होती. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आत्महत्या करावी वाटली होती, असे धक्कादायक वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात पहिल्या चेंडूपासून भारताने पकड ठेवली होती. रोहित शर्माची शतकी खेळी आणि विराट कोहलीचे अर्धशतक या जोरावर भारताने पाकसमोर 337 धावांचा आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानला काही चांगली कामगिरी करता आली नाही. यासंदर्भात बोलताना आर्थर म्हणाले, विश्वचषक सारख्या स्पर्धेत जेव्हा तुमचा एकदा पराभव होतो तेव्हा पुन्हा तुमचा पराभव होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक पराभवामुळे तुमच्यावरील तणाव वाढत जातो. भारतासारख्या संघाविरुद्ध खेळत असताना चाहत्यांच्या अपेक्षा जास्त असतात. सर्वांचे लक्ष तुमच्या कामगिरीवर असते. या सामन्यात खेळाडूंप्रमाणे माझ्यावर देखील दडपण होते. भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर मला आत्महत्या करावी वाटल्याचे आर्थर म्हणाले.
पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत जोरदार कमबॅक केलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पाकचे 6 सामन्यात 5 गुण झाले आहेत. जर पाकिस्तानने पुढचे तीनही सामने जिंकले तर त्यांना सेमिफायनलला जागा मिळू शकते. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. पाकिस्तानच्या वर लंकेचा संघ असून ते एका सामन्यात जरी पराभूत झाले आणि इतर सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 10 गुण होतील.
SPECIAL REPORT: यंदा वारीवर दुष्काळाचं सावट