मुंबई, 18 नोव्हेंबर : लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League 2020) ची सुरुवात 26 नोव्हेंबरपासून होणार आहे. या लीगमध्ये वेगवेगळ्या देशांचे अनेक खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेत काही भारतीय खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. यामध्ये 2011 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताच्या टीममधील फास्ट बॉलर मुनाफ पटेल (Munaf Patel) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांचा समावेश आहे. मुनाफ पटेल आणि इरफान पठाण यांनी कॅन्डी टस्कर्स या टीमसोबत करार केला आहे. याशिवाय वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू क्रिस गेलही याच टीममधून खेळताना दिसेल.
कॅन्डी टस्कर्सनी मुनाफ पटेल आणि पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर सोहेल तनवीरला वहाब रियाज आणि लियमा प्लंकेट यांच्याऐवजी टीममध्ये घेतलं आहे. भारतातली फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनी माय 11 सर्कल एलपीएलच्या पहिल्या मोसमासाठीची स्पॉन्सर आहे.
मुनाफ पटेलने भारतासाठी 13 टेस्ट, 70 वनडे आणि 3 टी-20 मॅच खेळल्या आहेत. टेस्टमध्ये मुनाफने 35 विकेट, वनडेमध्ये 86 विकेट आणि टी-20 मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय मुनाफने आयपीएलच्या 63 मॅचही खेळल्या. आयपीएलमध्ये मुनाफला 74 विकेट घेता आल्या. तर याच वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेल्या इरफानने भारताकडून 29 टेस्ट, 120 वनडे आणि 24 टी-20 मॅच खेळल्या.
एलपीएलने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार इरफान पठाण म्हणाला, 'मी एलपीएलमध्ये कॅन्डी टस्कर्स टीमशी जोडला गेल्यामुळे उत्साही आहे. आमच्या टीममध्ये उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी या लीगमध्ये खेळण्यासाठी तयार आहे.'
इरफान पठाण आणि मुनाफ पटेल यांच्याशिवाय मनप्रीत गोणी आणि मनविंदर बिस्ला हे खेळाडूही या लीगमध्ये दिसतील. हे दोन्ही खेळाडू फाफ डुप्लेसिस आणि आंद्रे रसेलसोबत कोलंबो किंग्जच्या टीममध्ये आहेत.
एलपीएलच्या या पहिल्या स्पर्धेत 5 टीम सहभागी होतील. कोलंबो किंग्ज, दांबुला हॉक्स, जाफना स्टालियन, गेल ग्लेडियेटर्स आणि कॅन्डी टस्कर्स या टीम एकमेकांविरुद्ध खेळतील. 15 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 23 मॅच खेळवल्या जाणार आहेत. या सगळ्या मॅच पलेकल आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होतील. या लीगची सुरुवात 26 नोव्हेंबरपासून होईल, तर फायनल मॅच 16 डिसेंबरला होईल.