मुंबई, 24 जानेवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) टेस्ट सीरिजसाठी पाच खेळाडूंची कव्हर म्हणून निवड झाली आहे. या पाच खेळाडूंमध्ये के.एस. भरतचा (K.S. Bharat) समावेश आहे. आंध्र प्रदेशचा हा विकेटकिपर बॅट्समन धडाकेबाज खेळासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ओळखला जातो. त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील इतरांपेक्षा वेगळं आहे.
10 वर्ष डेटिंग
केएस भरतचं पूर्ण नाव कोना श्रीकर भरत आहे. त्याचे वडिल श्रीनिवास राव नौदलातील डॉकयार्डमध्ये कर्मचारी असून आई कोना देवी या गृहिणी आहेत. भरतला एक बहिण असून तिचं नाव मनोगना लोकेश आहे. आपल्या आजवरच्या वाटचालीमध्ये कुटुंबीयांचं मोठं योगदान असल्याचं भरत सांगतो.
भरतनं कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमध्ये (Lockdown) त्याची गर्लफ्रेंड अंजलीशी लग्न केलं. विशाखापट्टणमधील एका साध्या कार्यक्रमात दोघांचं लग्न झालं. विशेष म्हणजे या दोघांचं नातं 10 वर्ष जुनं होतं. तब्बल 10 वर्षांच्या डेटिंगनंतर त्यानं अंजलीशी लग्न केलं.
भरतनं त्याच्या छातीवर टॅटू (Tattoo) गोंदवला असून त्यामध्ये त्यानं आई-वडिलांचं नाव गोंदवून घेतलं आहे. अनेक फोटोंमध्ये त्यानं हा टॅटू एक्सपोज केला आहे.
भरतची क्रिकेट कारकीर्द
भरत हा रणजी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा एकमेव विकेटकिपर बॅट्समन आहे. त्यानं 2015 साली हा पराक्रम केला होता. भरतनं आजवर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 37.24 च्या सरासरीनं 4283 रन काढले आहेत. यामध्ये 9 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं विकेट किपर म्हणून 270 कॅचेस घेतल्या असून 31 स्टंपिंगही केले आहेत.
टीम इंडियात यापूर्वीही निवड
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 2019 साली कोलकातामध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टसाठी अतिरिक्त विकेटकिपर म्हणून त्याची भारतीय टीममध्ये निवड झाली होती. मात्र, त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले नाही.
आता इंग्लंड दौऱ्यासाठीही कव्हर म्हणून निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. भरतला अंतिम 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता अगदीच कमी आहे, मात्र त्याला संधी मिळाल्यास तो या संधीचं सोनं नक्कीच करु शकतो. तसंच त्याच्या भविष्यातील क्रिकेटसाठी देखील ही संधी मोलाची ठरणार आहे.