Home /News /sport /

'कॉफी विथ करण'चा वाद, पांड्या म्हणतो 'मला त्या शब्दाचा अर्थही माहिती नव्हता'

'कॉफी विथ करण'चा वाद, पांड्या म्हणतो 'मला त्या शब्दाचा अर्थही माहिती नव्हता'

करण जोहर (Karan Johar) याच्या कॉफी विथ करण (Koffee with Karan) या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) वर बीसीसीआय (BCCI)ने निलंबनाची कारवाई केली होती.

    मुंबई, 5 डिसेंबर : पाठीच्या दुखापतीवर मागच्यावर्षी लंडनमध्ये शस्त्रक्रिया केलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुखापतीमुळे बॉलिंग करत नसला, तरी पांड्याने बॅट्समन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बॉलिंग करण्यासाठी फिट नसला तरी पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये बॉलिंग करत स्टीव्ह स्मिथची विकेट घेतली. आयपीएलमध्येही त्याने मुंबईला जिंकवण्यात मोलाची कामगिरी केली. हार्दिक पांड्या आता फॉर्ममध्ये असला तरी त्याआधी मैदानात आणि मैदानाबाहेरही त्याला संघर्ष करावा लागला. करण जोहर (Karan Johar) याच्या कॉफी विथ करण (Koffee with Karan) या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे हार्दिक पांड्यावर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली होती. कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक आणि केएल राहुल गेले होते. या कार्यक्रमात बोलताना हार्दिक पांड्याने महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हार्दिक पांड्याच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. सोशल मीडियावरही हा मुद्दा पेटला होता. यानंतर बीसीसीआयने हार्दिक आणि राहुलचं काही काळासाठी निलंबन केलं. आयुष्यातला तो काळ सगळ्यात वाईट होता, असं आता हार्दिक म्हणाला आहे. टाईम्स ऑफ इंडियासोबत हार्दिक बोलत होता. 'महिलांबाबतच्या त्या वक्तव्यानंतर मला Misogynistic म्हणून संबोधण्यात आलं, पण या शब्दाचा अर्थही मला माहिती नव्हता. मला सुरुवातीला वाटलं की माझ्यासोबत मस्करी करण्यासाठी या शब्दाचा प्रयोग होत आहे. पण एका मित्राने मला याचा अर्थ सांगितला. या शब्दाचा अर्थ महिला विरोधी आणि महिलांना पसंत न करणारा असा होतो, हे मला नंतर कळलं,' अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली 'मी महिलांना नापसंत कसं करू शकतो? मला बहिण, आई, वहिनी, बायको आहे. माझ्या घरात एवढ्या महिला आहेत. त्यांच्यामुळेच आपण आहोत,' असं वक्तव्य हार्दिकने दिलं. सूरतमध्ये जन्मलेल्या हार्दिक पांड्याने या घटनेनंतर स्वत:ला घरात कैद करून घेतलं होतं. जेव्हा लोकं माझ्या विरोधात होते, तेव्हा माझं कुटुंबच माझ्यासोबत होतं. पहिल्यांदाच माझा स्वत:वरचा ताबा सुटला होता. चारही बाजूंना गोष्टी तुटतच चालल्याचं मला दिसत होतं, पण त्यावेळी कुटुंबाने मला आधार दिल्याचं हार्दिक म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या