मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics 2020: शेतकरीपुत्राची वयाच्या 19व्या वर्षी झाली होती सैन्यात निवड; वाचा नीरज चोप्राचा प्रेरणादायी प्रवास

Tokyo Olympics 2020: शेतकरीपुत्राची वयाच्या 19व्या वर्षी झाली होती सैन्यात निवड; वाचा नीरज चोप्राचा प्रेरणादायी प्रवास

नीरजची वाटचाल खूप प्रेरक असून, त्याच्या उत्तम कामगिरीमुळे तो या ऑलिम्पिकमध्ये नक्की पदक जिंकेल, असा विश्वास सर्वांना वाटत आहे.

नीरजची वाटचाल खूप प्रेरक असून, त्याच्या उत्तम कामगिरीमुळे तो या ऑलिम्पिकमध्ये नक्की पदक जिंकेल, असा विश्वास सर्वांना वाटत आहे.

नीरजची वाटचाल खूप प्रेरक असून, त्याच्या उत्तम कामगिरीमुळे तो या ऑलिम्पिकमध्ये नक्की पदक जिंकेल, असा विश्वास सर्वांना वाटत आहे.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये साईकोम मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू यांनी भारतासाठी पदकांची कमाई केली. भारतीय महिलांच्या हॉकी टीमने ऐतिहासिक कामगिरी करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर भालाफेक (Javelin Throw) या क्रीडाप्रकारातल्या क्वालिफिकेशन राउंडमध्ये नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा भारतीय खेळाडू पहिल्या क्रमांकावर असल्याने आता सात ऑगस्टला तो फायनलमध्ये आपल्या कौशल्याचं प्रदर्शन घडवणार आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या नीरजची वाटचाल खूप प्रेरक असून, त्याच्या उत्तम कामगिरीमुळे तो या ऑलिम्पिकमध्ये नक्की पदक जिंकेल, असा विश्वास सर्वांना वाटत आहे. 'आज तक'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    24 डिसेंबर 1997 रोजी नीरज चोप्राचा जन्म झाला. हरियाणाच्या (Haryana) पानिपत (Panipat) जिल्ह्यातलं खांद्रा हे त्याचं गाव. त्याचे वडील छोटे शेतकरी असून, एकत्र कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला. नीरजचं शिक्षण चंडीगडमध्ये (Chandigarh) झालं. 2016 साली पोलंडमध्ये झालेल्या IAAF वर्ल्ड U-20 चॅम्पियनशिपमध्ये नीरजने 86.48 मीटर एवढ्या अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं. या कामगिरीमुळे वयाच्या 19व्या वर्षीच त्याची लष्करात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) म्हणून नियुक्ती झाली होती. 'माझे वडील शेतकरी आहेत, तर आई गृहिणी. मी एकत्र कुटुंबात राहतो. माझ्या कुटुंबात कोणालाही सरकारी नोकरी नाही. त्यामुळे माझ्या कामगिरीवर सगळे खूश आहेत. आता मी माझं प्रशिक्षण सुरू ठेवण्याबरोबरच कुटुंब चालवण्यासाठी आर्थिक हातभारही लावू शकतो,' असे उद्गार नीरजने या नियुक्तीनंतर काढले होते.

    2016 साली वर्ल्ड U-20 चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक (Gold Medal) जिंकल्यानंतर नीरजने त्याच वर्षी दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये (South Asian Games) 82.23 मीटर अंतरावर भालाफेक करून पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर 2017 साली त्याने एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही (Asian Athletics Championship) 85.23 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं. कोणत्याही जागतिक पातळीवरच्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अंजू बॉबी जॉर्जनंतरचा नीरज हा भारताचा दुसराच खेळाडू आहे.

    केवळ 23 वर्षांच्या असलेल्या नीरजने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सेंट्रल नॉर्थ ईस्ट मीटिंग अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 87.86 मीटर अंतरावर भालाफेक केली होती आणि त्यामुळेच तो यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympics) पात्र ठरला. पात्रतेसाठी 85 मीटर अंतरावर भालाफेक करणं आवश्यक होतं.

    2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या के. केशोरन वाल्कॉट या खेळाडूने 85.38 मीटर अंतरावर भालाफेक केली होती आणि त्याला कास्यपदक मिळालं होतं. नीरजने आतापर्यंत 88.07 मीटर एवढ्या अंतरापर्यंत भालाफेक केलेली आहे. त्यामुळे त्याने आपल्या या बेस्ट थ्रोएवढी (Best Throw) कामगिरी केली, तरी त्याला पदक मिळेल हे नक्की असल्याचं मानलं जात आहे.

    हे वाचा - Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक

    2017 चा वर्ल्ड चॅम्पियन असलेला जर्मनीचा जोहानेस वेटर यालाही नीरजने मागे टाकलं आहे. नीरजपाठोपाठ जोहानेस दुसऱ्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकमध्ये नीरजला हरवणं कठीण आहे, असं जोहानेसने आधीच सांगितलं होतं. यावरूनच नीरजच्या कामगिरीचा किती प्रभाव त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवरही आहे, याची कल्पना येते.

    2018 साली इंडोनेशियात जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नीरजने 88.06 मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला होता. एवढंच नव्हे, तर आशियाई स्पर्धेतलं भालाफेक या क्रीडाप्रकारातलं भारताचं ते आतापर्यंतचं दुसरं पदक ठरलं. नीरजच्या आधी 1982 साली गुरुतेजसिंग या खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात कास्यपदकाची कमाई केली होती.

    2018 सालची आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यानंतर दुर्दैवाने नीरजच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला बराच काळ खेळापासून दूर राहावं लागलं. 2019 साल त्याच्यासाठी चांगलं गेलं नाही. त्यानंतर कोरोना महामारीमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्दही झाल्या. एवढा खंड पडूनही नीरजने आपल्या कामगिरीत सातत्य राखलं. 2021च्या मार्च महिन्यात झालेल्या इंडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत नीरजने 88.07 मीटर एवढ्या अंतरावर भालाफेक करून स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. त्याची ही आतापर्यंतची सर्वांत उत्तम कामगिरी होती. या सगळ्यामुळेच नीरजकडून पदकाच्या आशा अतिशय उंचावल्या आहेत.

    First published:

    Tags: Olympics 2021