नवी दिल्ली, 1 डिसेंबर: पुढील वर्षी (2022) एप्रिल महिन्यात इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा सीझन (IPL Season 15) खेळवला जाणार आहे. या सीझनमध्ये दोन नवीन टीमचा समावेश करण्यात आला असून, आता एकूण 10 टीम लीगमध्ये दिसतील. लीगच्या नवीन सीझनसाठी लवकरच खेळाडूंचा महालिलाव (IPL MegaAuction 2022) भरवण्यात येणार आहे. प्रत्यक्ष लिलावापूर्वी जुन्या सर्व आठ टीम्सना त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याच्या सुचना देण्यात आला होत्या. त्यानुसार टीम्सनी आपल्या (retain) कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. जाहीर करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये काही नावं अशी आहेत ज्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) ऑलराउंडर खेळाडू व्यंकटेश अय्यरचा (Venkatesh Iyer) यामध्ये समावेश होतो. केकेआरनं आपल्या या तरुण खेळाडूला टीममध्ये कायम ठेवण्यासाठी मोठी रक्कम मोजली आहे.
विशेष म्हणजे, व्यंकटेश अय्यर आणि बॉलीवूडचा भाईजान म्हणचे अभिनेता सलमान खान(salman khan) या दोघांचे खास कनेक्शन आहे. त्यात भर आता किंग खान म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानची (shahrukh khan) पडली आहे. तो अय्यरचा जबर फॅन असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. कारण केकेआरनं या तरुण खेळाडूला टीममध्ये कायम ठेवण्यासाठी मोठी रक्कम मोजली आहे.
अय्यर आणि सलमान खान या दोघांचाही जन्म एकाच गावात म्हणजेच इंदौरमध्ये झाला आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी फ्रँचायझींनी आपल्या लाडक्या खेळाडूंना कायम ठेवलं. यामध्ये काही तरुण नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. केकेआरनं आपल्या चार जुन्या खेळाडूंना कायम ठेवलं आहे. आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (आठ कोटी), व्यंकटेश अय्यर (आठ कोटी) आणि सुनील नरेन (सहा कोटी) अशी कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं आहेत. यापैकी व्यंकटेश अय्यर सर्वांत जास्त चर्चेत राहिला.
कोलकात्याच्या संघात अनेक तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी आपल्या फ्रँचायझीसाठी चांगली कामगिरी केली आहे. आगामी सीझनसाठी त्या दिग्गजांऐवजी केकेआरनं व्यंकटेश अय्यरला प्राधान्य दिलं आहे. या स्टार ऑलराउंडरला (All rounder) पुन्हा आपल्या संघात घेण्यासाठी केकेआरला मोठी रक्कम खर्च करावी लागली. केकेआरनं आठ कोटी रुपये खर्च करून अय्यरला कायम ठेवलं आहे.
व्यंकटेश अय्यरच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं 10 सामने खेळून 41.1 च्या सरासरीनं 370 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 128.5 इतका आहे. बॅटिंगशिवाय तो बॉलिंगही करतो. त्यानं चार इनिंग्जमध्ये तीन विकेट्स मिळवलेल्या आहेत. फक्त 10 आयपीएल सामन्यांचा अनुभव असलेल्या अय्यरसाठी आठ कोटी रुपये खर्च करून केकेआर फ्रँचायझीनं मोठा डाव टाकला आहे.
केकेआरमधल्या इतर खेळाडूंना पुन्हा लिलावाला सामोर जावं लागणार आहे. शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयान मॉर्गन, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, लोकी फर्ग्युसन यांसारखे दिग्गज खेळाडू लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएलचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
विराट कोहली (Virat Kohli) (RCB), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रवींद्र जडेजा (CSK), ऋषभ पंत (दिल्ली), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह (मुंबई) आणि केन विल्यम्सन (सनरायझर्स हैदराबाद) या दिग्गज खेळाडूंना त्यांच्या अगोदरच्या फ्रँचायझींनी बक्कळ पैसा देऊन टीममध्ये कायम ठेवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, KKR, Salman khan, Shah Rukh Khan