Home /News /sport /

काश्मीरच्या खेळाडूची IPL मध्ये एण्ट्री, पठाण म्हणतो, 'मोठा ऑलराऊंडर होईल'

काश्मीरच्या खेळाडूची IPL मध्ये एण्ट्री, पठाण म्हणतो, 'मोठा ऑलराऊंडर होईल'

आयपीएल 2020 (IPL 2020)मध्ये मंगळवारी 11व्या मॅचमध्ये हैदराबादने (Sunrisers Hyderabad ) विजयाचं खातं उघडलं. पॉवर हिटिंगसाठी 18 वर्षांच्या या काश्मिरी खेळाडूची आता या संघात एंट्री झाली आहे.

    दुबई, 30 सप्टेंबर : आयपीएल 2020 (IPL 2020)मध्ये मंगळवारी 11व्या मॅचमध्ये हैदराबादने विजयाचं खातं उघडलं. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) ने या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) चा 15 रननी पराभव केला. या मॅचमधून स्पर्धेत काश्मिरी क्रिकेटपटूची एण्ट्री झाली आहे. काश्मीरच्या अब्दुल समद (Abdul Samad)ने या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. हैदराबादकडून खेळताना समदला जास्त वेळ बॅटिंग करायची संधी मिळाली नाही. त्याने 7 बॉलमध्ये नाबाद 12 रन केले. 18 वर्षांचा अब्दुल समद पॉवरहिटिंगसाठी ओखळला जातो. सनरायजर्स हैदराबादने त्याच्यावर 20 लाखांची बोली लावून टीममध्ये घेतलं. काश्मीरचा अब्दुल समद मोठा ऑलराऊंडर होऊ शकतो, असं भाकीत माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) ने केलं आहे. इरफान पठाण हा जम्मू-काश्मीर टीमचा प्रशिक्षक होता, त्यामुळे त्याने अब्दुल समदचा खेळ जवळून बघितला आहे. समद आयपीएलमध्ये खेळणारा काश्मीरचा तिसरा खेळाडू आहे. अब्दुल समद दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायला उतरला, तेव्हा सनरायजर्सचा स्कोअर 17.5 ओव्हरमध्ये 144 रन होता. समद बॅटिंगला आला तेव्हा सनरायजर्सच्या इनिंगचे 13 बॉल बाकी होते. यापैकी समदने 7 बॉल खेळले, यात त्याने 1 फोर आणि 1 सिक्स मारून नाबाद 12 रन केले. अब्दुल समद सनरायजर्स हैदराबादसाठी लकी ठरला, कारण त्याला टीममध्ये सामील केल्यानंतर हैदराबादने मोसमातला पहिलाच सामना जिंकला. स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करताना इरफान पठाण म्हणाला, 'अब्दुल समदला सध्या बॅट्समन किंवा पॉवरहिटर म्हणूनच ओळखलं जातं. पण तो चांगली लेग स्पिन बॉलिंगही करू शकतो, हे कमी लोकांना माहिती आहे. पुढच्या 2-3 वर्षात अब्दुल समद चांगला ऑलराऊंडर म्हणून उदयाला येईल.' 'अब्दुल समदच्या आयपीएल पदार्पणामुळे जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे जम्मू-काश्मीरच्या तरुणांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार होईल,' असं ट्विट इरफानने केलं आहे. 18 वर्षांच्या अब्दुल समद याने 2019 सालीच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आतापर्यंत 10 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 39.46 च्या सरासरीने 592 रन केले. यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे. समदने 11 टी-20 मॅचमध्ये 40 ची सरासरी आणि 136.36 च्या स्ट्राईक रेटने 240 रन केल्या आहेत. समदच्या नावावर 8 लिस्ट ए मॅचमध्ये 29.62 च्या सरासरीने 237 रन आहेत. अब्दुल समदच्या आधी परवेझ रसूल (Parvez Rasool) आणि रसिक सलाम (Rasikh Salam) या जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये आपलं नशीब आजमावलं. किंग्ज-11 पंजाबने 2018 साली मंझूर दार (Manzoor Dar) यालाही टीममध्ये घेतलं, पण त्याला अजूनही पदार्पणाची संधी मिळाली नाही.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या