मुंबई, 31 जुलै : काश्मीर प्रीमियर लीगच्या (Kashmir Premier League) मुद्द्यावरून बीसीसीआयने (BCCI) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आणि दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जला (Herschelle Gibbs) प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाला देशातल्या क्रिकेट यंत्रणेबाबत निर्णय घ्यायचा अधिकार आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काश्मीर प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याबाबत आपल्यावर बीसीसीआयकडून दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप हर्षल गिब्जने केला होता.
'मॅच फिक्सिंगप्रकरणी सीबीआयकडून चौकशी झालेल्या खेळाडूने केलेले आरोप खरे आहेत का खोटे, हे कोणीही सांगू शकत नाही. गिब्जने केलेले हे आरोप जरी खरी असले, तरी बीसीसीआयला देशातल्या क्रिकेट यंत्रणेबाबत निर्णय घ्यायचा अधिकार आहे, हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लक्षात घ्यावं,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड गोंधळलेलं आहे. भारतात होणारं क्रिकेट हा बीसीसीआयचा अंतर्गत प्रश्न आहे. हा मुद्दा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीकडे घेऊन जाऊ शकतं, पण पाकिस्तान असं का वागत आहे? अशा कृती करायला त्यांना प्रोत्साहन का मिळत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे,' असं बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले.
'पाकिस्तानने हा मुद्दा आयसीसीपुढे नेला तरी काही हरकत नाही. पाकिस्तानच्या संविधानानुसार पंतप्रधान त्यांच्या क्रिकेटचे संरक्षक आहेत, त्यामुळे या गोष्टी कुठून येत आहेत, हे समजू शकतं,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काय म्हणाला हर्षल गिब्ज?
पाकिस्तानसोबत आपला राजकीय अजेंडा राबवला जात आहे, काश्मीर प्रीमियर लीग खेळू नये म्हणून बीसीसीआय अशा गोष्टी करत आहे, ज्याची गरज नाही. क्रिकेटसंबधी कोणत्याही गोष्टींसाठी भारतात येऊ देणार नाही, अशी धमकीही मला दिली जात आहे, हे चुकीचं आहे, असं ट्वीट हर्षल गिब्जने केलं.

काश्मीर प्रीमियर लीगला पुढच्या महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये हर्षल गिब्ज, तिलकरत्ने दिलशान, मॉन्टी पनेसार यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळणार आहेत. लीगमध्ये ओवरसीज वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावळकोट हॉक्स, बाग स्टालियन, मीरपूर रॉयल्स आणि कोटली लायन्स या 6 टीम सहभागी होणार आहेत.
काश्मीर प्रीमियर लीगच्या टीमचं नेतृत्व इमाद वसीम, मोहम्मद हफीज, शाहिद आफ्रिदी, शादाब खान, शोएब मलिक आणि कामरान अकमल करणार आहेत. प्रत्येक टीममध्ये पाकव्याप्त काश्मीरमधले 5 क्रिकेटपटू असतील. काश्मीर प्रीमियर लीगच्या या मोसमाचं आयोजन यावर्षी मे महिन्यात होणार आहे, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला स्पर्धा स्थगित करावी लागली होती, कारण पाकिस्तान सुपर लीग त्यावेळी पूर्ण झाली नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.