कॅनबरा, 2 फेब्रुवारी : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्ने याच्या डोक्याला चेंडू लागल्याने तो मैदानावरच कोसळला. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं. करुणारत्नेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पेंट कमिन्स याचा वेगवान चेंडू करुणारत्नेच्या डोक्याला मागच्या बाजूला लागला. 142 प्रतितास इतक्या वेगाने चेंडू लागल्याने करुणारत्ने मैदानावरच कोसळला. त्यानंतर करुणारत्नेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दिमुथ करुणारपत्ने मैदानावर कोसळला तेव्हा सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. यापूर्वी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्युजेसला बाऊन्सर चेंडू डोक्यावर आदळल्याने जीव गमवावा लागला होता. त्यावेळी फिलिप जाग्यावरच बेशुद्ध झाला होता.