मुंबई, 5 जुलै : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत आता चर्चा सुरू झाली आहे, पण भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी मात्र जर रवी शास्त्री चांगले निकाल देत असतील, तर त्यांना हटवण्याची काहीच गरज नसल्याचं सांगितलं आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने 1983 सालचा वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा रवी शास्त्री भारतीय टीममध्ये होते, पण त्यांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा प्रशिक्षक होईल, अशी चर्चा सुरू आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावरही राहुल द्रविडलाच प्रशिक्षक करण्यात आलं आहे. एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले, 'सध्या तरी या मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही. श्रीलंकेत कामगिरी कशी होते ते पाहू. नवीन कोच तयार करण्यात काहीच चुकीचं नाही. पण रवी शास्त्री चांगली कामगिरी करत आहे, तर त्यांना हटवण्याची काहीच गरज नाही. यामुळे कोच आणि खेळाडूंवर अनावश्यक दबाव वाढतो.'
रवी शास्त्री प्रशिक्षक असताना भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला. तसंच टीम 2019 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचली. या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. विराटच्या नेतृत्वात भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळेल, तर शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेत वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे.
रवी शास्त्रींनंतर हे 5 दिग्गज टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायच्या रेसमध्ये
'भारताकडे खेळाडूंचा मोठा पूल आहे. जर खेळाडूंना संधी मिळते आणि भारत इंग्लंड-श्रीलंकेमध्ये दोन वेगवेगळ्या टीम घेऊन मैदानात उतरून विजय मिळाला तर यापेक्षा चांगलं काय असेल,' असं वक्तव्य कपिल देव यांनी केलं.
भारत-श्रीलंका यांच्यात 13 जुलैला पहिली वनडे होणार आहे. तर भारत-इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरूवात होईल. टीम इंडिया 2007 नंतर इंग्लंडमध्ये सीरिज जिंकली नाही. 2018 साली विराट कोहली कर्णधार असताना भारतीय टीमचा 4-1 ने पराभव झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.