मुंबई, 20 डिसेंबर : भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारने निवृत्ती जाहीर केली आहे. अनुप कुमारने प्रो-कबड्डीसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या खेळाची छाप पाडली. कॅप्टन कूल अनुप कुमार बोनस पॉईंटचा बादशाह म्हणूनही ओळखला जातो. बुधवारी रात्री अनुप कुमाने आपण कबड्डीतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
अनुप कुमारने 2006 साली आपल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी कारकिर्दीची सुरूवात केली. त्यानंतर अनुपने कर्णधार म्हणून भारतीय संघाला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवून दिलं. 2016 साली झालेल्या विश्वचषकात भारताने अनुपच्याच नेतृत्वात बाजी मारली होती.
अनुप कुमारच्या खेळाची खऱ्या अर्थाने दखल घेतली गेली ती प्रो-कबड्डी या स्पर्धेत. पहिले पाच पर्व यू मुम्बा या संघाकडून खेळणाऱ्या अनुप कुमारला सहाव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सने आपल्या संघात घेतलं होतं. मात्र यंदाच्या हंगामात अनुप आणि जयपूरच्या संघाला आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे पंचकुलात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान अनुपने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
रेडर म्हणून अनुपचा खेळ अप्रतिम होताच, पण एक कर्णधार म्हणूनही तो सर्वोत्तम होता. शांत, संयमी आणि संघाला एकत्र ठेवण्याच्या त्याच्या कलेची सर्वांनीच दखल घेतली. प्रो-कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून अनुप कुमारने तरुण पिढीला कबड्डीचं अक्षरश: वेड लावलं.
अनुपच्या निवृत्तीनंतर त्याचे असंख्य चाहते भावुक झालेले पाहायला मिळालं.गेल्या काही दिवसांपासून फिटनेस आणि कामगिरीत सातत्य नसल्याने अनुपच्या निवृत्तीबाबत बोललं जात होतं. अखेर बुधवारी रात्री अनुपने याबाबत घोषणा केली.
VIDEO : भाजपच्या तिकीटावर मीच खासदार म्हणून निवडून येणार-संजय काकडे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा