नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : न्यूझीलंडने ( New Zealand) पहिल्यांदाच टी- 20 विश्वचषक ( T20 World Cup) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया ( Australia) आणि पाकिस्तान यांच्यात मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धूळ चारून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता येत्या रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या दोन टीम्समध्ये अंतिम मॅच रंगणार आहे. या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी (10 नोव्हेंबर) एक आश्चर्यकारक निकाल लागला. जेतेपदासाठी प्रमुख दावेदार समजला जाणारा इंग्लंडचा ( England) संघ या स्पर्धेमधून बाहेर पडला. दोन वर्षांपूर्वी लॉर्ड्स ग्राउंडवर झालेली फायनल मॅच टाय झाली. मात्र तरीही गुणांच्या आधारे न्यूझीलंडवर सरशी साधत इंग्लंडने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं होतं. बुधवारी या पराभवाची परतफेड करण्यात अखेर न्यूझीलंडला यश आलं. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात जिमी नीशामने ( Jimmy Neesham) महत्त्वाची भूमिका बजावली. पण तुम्हाला माहिती आहे का, हा जिमी नीशाम 2017 मध्ये क्रिकेटला रामराम ठोकणार होता.
आयसीसी टी-20 विश्वचषकात बुधवारी झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड हा या स्पर्धेची फायनल गाठणारा यंदाचा पहिला संघ ठरला आहे. तसंच, न्यूझीलंड संघाने टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेमी फायनलमध्ये प्रथम बॅटिंग करताना इंग्लंड संघाने 20 षटकांत 4 बाद 166 रन्स केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने विजयाचं लक्ष्य 19व्या ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
लक्ष्याचा पाठलाग करताना किवी टीमचा मार्ग कठीण झाला होता. मार्टिन गप्टिल आणि केन विल्यमसन यांच्या विकेट्स लवकर गमावल्याने टीम दडपणाखाली आली. इंग्लंडच्या शानदार बॉलिंगसमोर न्यूझीलंडचा विजय अवघड वाटत होता. चार विकेट्स गेल्यानंतर डॅरिल मिशेल आणि जिमी नीशम यांनी तुफानी बॅटिंग करून संघाची विजयाची वाटचाल सोपी केली. नीशमने 11 बॉलमध्ये 27 रन्स केल्या आणि इथूनच सामना इंग्लंडच्या हातातून गेला.
2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला तेव्हा नीशमला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा त्याने एक ट्विट केलं होतं. 'मुलांनो, खेळाकडे कधीही वळू नका. केक विका किंवा दुसरं कोणतंही क्षेत्र निवडा. वयाच्या 60 व्या वर्षी जाडजूड होऊन आनंदाने मरता येईल,' असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं.
2017 साली दुखापत आणि खराब फॉर्ममुळे नीशाम क्रिकेट सोडण्याचा विचार करत होता. तेव्हा त्याला संघात स्थान मिळवणं कठीण जात होतं. सततच्या दुखापतींमुळे तो त्रस्त झाला होता. तो एवढा वैतागला होता, की 2017 सालीच क्रिकेटला रामराम ठोकणार होता; मात्र त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ संघात स्थानच मिळवलं नाही तर महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आणण्याची कामगिरी केली आहे.
येत्या रविवारी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुबई येथे फायनल मॅच रंगणार आहे. या दोन्ही टीम्सना आतापर्यंत टी-20 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद एकदाही मिळालेलं नाही. त्यामुळे रविवारी या दोन्ही टीम्सपैकी कोणती टीम जिंकून पहिल्यांदा टी-20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावेल, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand