मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Jhulan Goswami: ‘दोन वेळा वर्ल्ड कप फायनल खेळले पण...’ निरोपाच्या वन डे आधी झुलननं व्यक्त केली खंत

Jhulan Goswami: ‘दोन वेळा वर्ल्ड कप फायनल खेळले पण...’ निरोपाच्या वन डे आधी झुलननं व्यक्त केली खंत

झुलन गोस्वामी

झुलन गोस्वामी

Jhulan Goswami: ‘मी दोन वर्ल्ड कप फायनल खेळले... पण विजेतेपद मिळालं नाही. मला फक्त याचच वाईट वाटतं कारण त्यासाठी तुम्ही चार वर्ष आधीपासून तयारी करत असता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 23 सप्टेंबर: भारतीय महिला क्रिकेटमधलं एक मोठं नाव म्हणजे झुलन गोस्वामी. 39 वर्षांची झुलन इंग्लंडविरुद्ध आज लॉर्डसवर कारकीर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. गेल्या दोन दशकात झुलननं भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं. भारतीय महिला क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं. झुलनचा प्रवास सुरु झाला तेव्हा महिला क्रिकेटला तितकं महत्व दिलं जात नव्हतं. पण माजी कर्णधार मिताली राज आणि झुलनसारख्या खेळाडूंनी महिला क्रिकेटला एक दिशा दिली आणि आज भारतात महिला क्रिकेटलाही पुरुषांइतकच मानाचं स्थान मिळताना दिसत आहे.

20 वर्षांची भव्य कारकीर्द

2002 साली झुलननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आजतगायत भारतीय आक्रमणाची धुरा तीनं समर्थपणे पेलली. केवळ भारतातच नव्हे तर आज ती जगातली सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून झुलनकडे पाहिलं जातं. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा मान झुलनकडे आहे. तिच्या खात्यात आजवर 352 आंतरराष्ट्रीय विकेट्स जमा आहेत. पण दोन दशकं भारतीय क्रिकेटचं प्रतिनिधित्व केल्यानंतर एक खंत मात्र झुलनच्या मनात कायम आहे. आणि तिनं काल ती बोलूनही दाखवली.

दोन वेळा वर्ल्ड कप फायनल गाठली पण...

अखेरच्या वन डेआधी काल झुलन पत्रकार परिषदेला सामोरी गेली. तेव्हा तिनं 2005 आणि 2017 च्या कटू आठवणी जाग्या केल्या. या दोन्ही वर्षी भारतीय महिला संघ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण दोन्ही वेळा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. 2017 साली तर इंग्लंडविरुद्धचा सामना भारतानं जवळपास जिंकलाच होता. पण दुर्दैवानं अखेरच्या क्षणी भारतीय संघ 9 धावांनी विश्वविजयापासून दूर राहिला. दोन दशकं खेळल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकू न शकल्याची खंत यावेळी झुलननं बोलून दाखवली.

‘मी दोन वर्ल्ड कप फायनल खेळले... पण विजेतेपद मिळालं नाही. मला फक्त याचच वाईट वाटतं कारण त्यासाठी तुम्ही चार वर्ष आधीपासून तयारी करत असता. मेहनत घेता. प्रत्येक खेळाडूसाठी वर्ल्ड कप जिंकणं हे एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखं असतं.’ असं झुलन म्हणाली.

भारताकडून पदार्पणाचा क्षण सर्वात खास

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील चकदा हे झुलनचं गाव. त्यावरुनच तिला ‘चकदा एक्स्प्रेस’ हे टोपण नावही मिळालं. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या झुलननं आपण क्रिकेटमध्ये करियर करु असा कधी विचारही केला नव्हता. पण 1996 साली कोलकात्यात झालेली वर्ल्ड कप फायनल झुलनच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरली. त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये झुलन बाऊंड्री लाईनाबाहेर बॉल गर्ल म्हणून उभी होती. स्टेडियममध्ये तेव्हा 90 हजार पेक्षा जास्त प्रेक्षक होते. त्याच वातावरणानं भारावलेल्या झुलननं एके दिवशी भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्न 2002 साली सत्यात उतरलं. 6 जानेवारी 2002 ला झुलननं इंग्लंडविरुद्ध वन डे पदार्पण केलं. पदार्पणाची ती कॅप मिळाली तो क्षण आपल्या आयुष्यातला खास क्षण असल्याचं झुलननं म्हटलं आहे.

हेही वाचा - T20 World Cup 2007: विश्वविजयाची 15 वर्ष... वर्ल्ड कप फायनल... ती शेवटची ओव्हर... तो कॅच आणि त्यानंतर घडला इतिहास!

झुलनच्या आयुष्यावर चित्रपट

झुलनच्या आजवरच्या कारकीर्दीवर एक सिनेमाही लवकरच येणार आहे. या सिनेमात झुलनची भूमिका साकारणार आहे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा. झुलनच्या टोपणनावावरुनच या सिनेमाचं नाव 'चकदा एक्स्प्रेस' असंच ठेवण्यात आलं आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Sports, Team india