मुंबई, 1 नोव्हेंबर: रोहित शर्मा आणि विराट कोहली... सध्याच्या भारतीय संघातील ही दोन मोठी नावं. रोहितच्या नेतृत्वात सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप मोहिमेवर आहे. याच दरम्यान सोमवारी बीसीसीआयच्या निवड समितीनं न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी टीमची घोषणा केली. पण त्यात न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित आणि विराटला विश्रांती देण्यात आली आहे. त्यावरुन बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मांनी एक विधान केलं आहे. त्यावरुन अनेकांचं म्हणणं आहे की रोहित आणि विराट कदाचित आपला शेवटचा टी20 वर्ल्ड कप खेळत आहेत.
न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया 3 टी20 आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. हा दौरा टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात टी20 संघाची कमान हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. तर वन डे मालिकेत शिखर धवन नेतृत्व करणार आहे. टीमची घोषणा झाल्यानंतर निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांना रोहित आणि विराटच्या विश्रांतीविषयी आणि पुढच्या वाटचालीविषी विचारण्यात आलं. तेव्हा वर्कलोड मॅनेंजमेंटमुळे त्यांना विश्रांती देण्यात आल्याचं चेतन शर्मा यांनी सांगितलं. तर पुढच्या वाटचालीविषयी ते म्हणाले की, 'एखादी टूर्नामेंट सुरु असताना याविषयी कसं बोलू शकतो... ते मोठे खेळाडू आहेत. त्यांना जर कधी काही वाटलं तर ते आमच्याशी थेट बोलतील.'
हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाचा हा मॅचविनर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आऊट? मोठी अपडेट समोर
2024 मध्ये टी20 वर्ल्ड कप
रोहित शर्मा सध्या 34 वर्षांचा आहे. तर विराट 33 वर्षांचा. सध्याचा फिटनेस पाहता पुढची दोन-तीन वर्ष हे दोघेही खेळू शकतील. आगामी टी20 वर्ल्ड कप हा 2024 साली होणार आहे. त्यामुळे कदाचित रोहित आणि विराट हो जोडी त्या वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसेल. पण त्याआधी फॉर्म आणि फिटनेस या गोष्टी महत्वाच्या ठरतील.
हेही वाचा - Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला पाहून पुजाऱ्याची खुलली कळी; नृसिंहवाडीतील सेल्फीचा लय भारी Video
टीम इंडिया सेमी फायनलच्या उंबरठ्यावर
दरम्यान सध्या सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सेमी फायनलच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय संघ तीन पैकी दोन मॅच जिंकून पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाचे उर्वरित दोन सामने बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma, Sports, T20 world cup 2022, Virat kohli